एकतर्फी रंगलेल्या दुसऱ्या टप्प्याच्या लढतीत वेस्ट हॅम युनायटेडचा ०-३ असा सहज पाडाव करत मँचेस्टर सिटीने लीग चषक फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. पहिल्या टप्प्यात ६-० असा विजय मिळवत मँचेस्टर सिटीने याआधीच अंतिम फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले होते. मॅन्यूएल पॅलेग्रिनी यांच्या प्रशिक्षकपदाखाली खेळणाऱ्या मँचेस्टर सिटीच्या विजयात अल्वारो नेग्रेडो आणि सर्जीओ अ‍ॅग्युरो यांनी मोलाची भूमिका बजावली. नेग्रेडो आणि अ‍ॅग्युरो यांनी पहिल्या सत्रात प्रत्येकी एक गोल झळकावल्यानंतर नेग्रेडोने दुसऱ्या सत्रात आणखी एका गोलाची भर घालत मँचेस्टर सिटीच्या विजयावर मोहोर उमटवली. २ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत मँचेस्टर सिटीला कट्टर प्रतिस्पर्धी मँचेस्टर युनायटेडचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पॅलेग्रिनी यांनी संघात आठ बदल करत नेग्रेडो, अ‍ॅग्युरो, जीजस नवास आणि फर्नाडिन्हो यांना संधी दिली होती. मँचेस्टर सिटीने या सामन्यासाठी फारच महागडे तिकीट ठेवल्यामुळे स्टेडियममध्ये शुकशुकाट जाणवत होता. त्यातच तिसऱ्या मिनिटालाच नेग्रेडोने वेस्ट हॅम युनायटेडचा बचाव भेदून पहिला गोल झळकावला होता. त्यानंतर अ‍ॅग्युरोने २४व्या मिनिटाला मँचेस्टर सिटीची आघाडी २-० अशी वाढवली. ६०व्या मिनिटाला नेग्रेडोने सामन्यातील दुसरा गोल करून सिटीला विजय मिळवून दिला.