मँचेस्टर सिटीने बलाढय़ टॉटनहॅमचा ५-१ असा धुव्वा उडवत इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेतील प्रतिस्पध्र्याना जणू इशाराच दिला आहे. या विजयासह मँचेस्टर सिटीने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेत जेतेपद उंचावण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
टॉटनहॅमच्या डॅनी रोझला वादग्रस्त पद्धतीने दाखविण्यात आलेले लाल कार्ड आणि त्याच आधारे मिळालेल्या पेनल्टीवर मँचेस्टर सिटीने दुसरा गोल झळकावला. पण पाच गोल करत मँचेस्टर सिटीने आपणच जेतेपदाच्या शर्यतीत अव्वल आहोत, हे दाखवून दिले. सर्जीओ अ‍ॅग्युरोने पेनल्टीवर पहिला गोल केल्यानंतर याया टौरे, इडिन झेको, स्टीव्हन जोव्हेटिक आणि विन्सेन्ट कोम्पानी यांनी गोल लगावले. या विजयासह सिटीने सर्व स्पर्धामध्ये सलग २० सामने जिंकण्याची किमया केली. त्याचबरोबर सिटीने गेल्या पाच सामन्यांत तब्बल २१ गोल साजरे केले.
अन्य सामन्यांत, अर्सेनल आणि साऊदम्प्टन यांच्यातील लढत २-२ अशी बरोबरीत सुटल्यामुळेच सिटीला ५३ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेता आली. अर्सेनल ५२ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. लिव्हरपूलने एव्हरटनचा ४-० असा सहज पराभव करत चौथे स्थान कायम राखले आहे.