सुरुवातीला पिछाडीवर पडलेल्या मँचेस्टर युनायटेडने नंतर जोमाने पुनरागमन करत सात गुणांच्या आघाडीसह वर्षांची सांगता केली आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये झालेल्या सामन्यात मँचेस्टर युनायटेडने वेस्ट ब्रूमविच अल्बियानचा २-० असा पराभव करून ४९ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. गॅरेथ मॅकऑले याने केलेला स्वयंगोल आणि अखेरच्या मिनिटाला रॉबिन व्हॅन पर्सीने शानदार गोल झळकावत युनायटेडच्या विजयावर मोहोर उमटवली.
थिओ वॉल्कॉटने झळकावलेल्या शानदार हॅट्ट्रिकमुळे अर्सेनलने न्यूकॅसल संघाचा ७-३ असा धुव्वा उडवला. या मोसमाअखेरीस वॉल्कॉटचा अर्सेनलबरोबरचा करार संपुष्टात येणार आहे. पण हॅट्ट्रिक साजरी करत वॉल्कॉटने अर्सेनलच्या संघव्यवस्थापनाला इशाराच दिला. वॉल्कॉटने हॅट्ट्रिकसह (२०व्या, ७३व्या आणि ९०व्या मिनिटाला) दोन गोल रचण्यात मोलाची भूमिका बजावली. अर्सेनलतर्फे ऑलिव्हियर गिरोडने (८४व्या आणि ८७व्या मिनिटाला) दोन गोल झळकावले तर अ‍ॅलेक्स ओक्सलाडे-चम्बेरलेन (५०व्या मिनिटाला) आणि लुकास पोडोलस्की (६४व्या मिनिटाला) यांनी प्रत्येकी एक गोल लगावला. अर्सेनलने या विजयासह सहाव्या क्रमांकावर झेप घेतली असली तरी अव्वल चार जणांत स्थान मिळवण्यासाठी त्यांनी चेल्सी आणि टॉटनहॅमवर दडपण आणले आहे.
अन्य सामन्यांत, मँचेस्टर सिटीने नॉर्विच सिटीवर ४-३ असा निसटता विजय मिळवत दुसरे स्थान पटकावले आहे. इडिन झेकोने पहिल्या पाच मिनिटांतच दोन गोल करत मँचेस्टर सिटीच्या विजयात मोलाचे योगदान दिले. टॉटनहॅमने संडरलँडवर २-१ अशी मात करत तिसऱ्या स्थानी मजल मारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manchester united first rank continue
First published on: 31-12-2012 at 12:20 IST