देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक महत्वाच्या क्रीडा स्पर्धांवर संकट ओढावलेलं आहे. २९ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धांवरही करोनामुळे गंडांतर आलेलं आहे. अनेक राज्य सरकार आयपीएलचे सामने पुढे ढकलावेत यासाठी केंद्र सरकारला विनंती करत असताना, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने आयपीएल सामने न खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. उप-मुख्यमंत्री मनिष सिसोदीया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याची माहिती दिली.

दिल्लीत आतापर्यंत सहा लोकांना करोनाची लागण झालेली आहे. या सहा लोकांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दिल्ली सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आलेल्या आहेत. याचसोबत ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील सिनेमागृहही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आणखी वाचा- #BREAKING : RCB च्या खेळाडूला करोनाची लागण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२९ मार्चपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होते आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. दरम्यान बीसीसीआय खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती सुत्रांकडून समजतेय. शनिवारी आयपीएलच्या गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होणार आहे, ज्यात आयपीएलच्या भवितव्याबद्दल निर्णय घेतला जाईल.