जयपूर : इंडियन प्रीमियर लीगला (आयपीएल) अवघा एक महिना शिल्लक असताना राजस्थानमधील सामन्यांचे आयोजन अडचणीत आले आहे. राजस्थान क्रीडा परिषदेने थकबाकीचे कारण देत राजस्थान क्रिकेट संघटनेच्या (आरसीए) कार्यालयासह सवाई मानसिंह स्टेडियमला शनिवारी सील केले.
राजस्थान क्रीडा परिषदेने शुक्रवारी ‘आरसीएला’ त्यांची मालमत्ता राज्य परिषदेकडे सुपूर्द करण्यास सांगितले होते. मात्र, ‘आरसीए’कडून या संदर्भात कुठलीच कृती करण्यात आली नाही. त्यामुळे क्रीडा परिषदेने परस्पर सामंजस्य करारानुसार अटी पूर्ण करण्यात अपयश आल्यामुळे आणि थकबाकी न भरल्यामुळे त्यांच्या संपूर्ण मालमत्तेला शनिवारी टाळे लावले. यामध्ये कार्यालयासह स्टेडियम आणि अकादमीचा समावेश आहे.
हेही वाचा >>>T20 World Cup 2024 : भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीटांसाठी प्रचंड मागणी, तब्बल २०० पट अधिक लोकांनी केली नोंदणी
‘‘या संदर्भात आम्ही ‘आरसीएला’ वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र, त्यांनी त्याला एकदाही उत्तर दिले नाही. केवळ परस्पर सामंजस्य करार आठ वर्षांवरून १० वर्षांपर्यंत वाढवावा इतकीच मागणी केली. त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या होत्या. त्यातील एकही जबाबदारी त्यांनी पूर्ण केली नाही,’’ असे राज्य क्रीडा परिषदेचे सचिव सोहन राम चौधरी यांनी सांगितले.
‘‘आम्ही ‘आरसीए’सोबत या संघर्षांवर तोडगा काढण्यासाठी अनेक बैठका घेतल्या. त्यांना अंदाजे २०० कोटी रुपये मिळाले. पण, त्यांनी आम्हाला काहीच रक्कम मिळाली नसल्याचे उत्तर दिले. राजस्थान प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांनी भरपूर पैसे कमावले. पण, सामंजस्य कराराचे त्यांनी पालन केले नाही. त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागले,’’ असे चौधरी यांनी सांगितले.
मानसिंह स्टेडियम सील करण्यात आले असले, तरी ‘आयपीएल’सह अन्य सामन्यांच्या आयोजनास कुठलीच अडचण येणार नाही, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले.