‘हिंद करंडक’ म्हणजे शालेय जीवनातील कबड्डी, खो-खो आणि लंगडी या खेळांमधील विश्वचषक स्पर्धा ही त्याची ओळख आजही अबाधित आहे. यंदा अमृत महोत्सव साजरे करणाऱ्या या स्पध्रेची भारताला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर ब्रिटिशांच्या राजवटीत मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यानंतर गेली अनेक वष्रे या कल्पवृक्षाची रसाळ गोमटी फळे क्रीडा क्षेत्राला अनुभवायला मिळत आहेत.
पारतंत्र्याच्या काळात ‘बलम् राष्ट्रस्य वर्धनम’ या ध्येयाने प्रेरित होऊन मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाची निर्मिती झाली. या संस्थेने लाठी, काठी, फरिगदगाछूट, लाठीछूठ, ढाल, तलवार, दांडपट्टा, लेझीम, कुस्ती, हुतुतू-कबड्डी, खो-खो, आटय़ापाटय़ा, सूर्यनमस्कार या खेळांचा तरुणांमध्ये प्रसार करण्याचे कार्य सुरू केले. त्यानंतर मुला-मुलींवर देशी खेळाचे संस्कार घडावे, या हेतूने शालेय स्तरावर हिंद करंडक स्पर्धा सुरू करण्याची योजना १ नोव्हेंबर १९४२ रोजी जाहीर करण्यात आली. यासाठी सीताराम पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली हिंद करंडक शालेय व महाविद्यालयीन समिती नेमण्यात आली. या समितीमध्ये य. ल. नाखवा, मानसिंगराव जगताप आणि कृष्णाजी सामंत यांचा समावेश होता. समिती नेमण्याआधीच हिंद करंडक हे नाव निश्चित झाले होते.
हुतुतू, खो-खो आणि लंगडी या तीन खेळांसाठीची स्पर्धा १९४३ पासून सुरू झाली. गवालिया टँक (क्रांती) मैदानावर झालेल्या पहिल्यावहिल्या स्पध्रेत दोन्ही हिंद करंडक जिंकण्याचा मान पार्ले टिळक विद्यालयाने पटकावला. या स्पध्रेची रचनात्मक आखणी करताना कुलाबा ते भायखळा पूल, भायखळा (पूर्व) ते सायन, भायखळा (पश्चिम) ते माहीम, वांद्रे ते अंधेरी, जोगेश्वरी ते दहिसर, कुर्ला ते चेंबूर आणि घाटकोपर ते मुलुंड असे एकूण सात विभाग करण्यात आले. विभागीय समित्यांतर्फे आयोजित स्पर्धामधील विजेत्या संघांमध्ये मध्यवर्ती ठिकाणी आंतरविभागीय स्पर्धा व्हायच्या. काही वष्रे या तीन स्पर्धासोबत मल्लखांब, अॅथलेटिक्स, लेझीम आणि लोकनृत्य या स्पर्धाही झाल्या होत्या.
स्पध्रेचा वाढता व्याप, वाहतुकीची गैरसोय, आयोजनातील अडचणी आदी कारणांस्तव हिंद करंडकाचा सुवर्ण महोत्सव झाल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९९६-९७ मध्ये मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाने ही स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याअगोदर या स्पध्रेने जवळपास दोनशे शाळांच्या सहभागापर्यंत उंची गाठली होती. ही स्पर्धा शालेय स्तरावर लोकप्रिय असल्यामुळे ती पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली. अखेरीस १९९९-२००० पासून नव्या स्वरूपात ही स्पर्धा अस्तित्वात आली. मंडळाच्या शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने संस्थेचे अध्यक्ष संजय शेटे आणि प्राचार्य डॉ. गो. वि. पारगावकर यांच्या नेतृत्वाखाली स्पध्रेच्या संयोजनाची जबाबदारी घेतली.
गेल्या काही वर्षांत प्रो कबड्डी लीगमुळे कबड्डी खेळाची चांगली वातावरणनिर्मिती झाली आहे. त्यामुळे शालेय वयात या गुणवत्तेला व्यावसायिकतेची जोड मिळावी म्हणून मुलांसाठीच्या मुंबई सुपर लीग कबड्डी स्पध्रेला गेल्या वर्षीपासून प्रारंभ झाला. मुलींसाठीही अशा प्रकारची लीग सुरू करण्याचे प्रयोजन आहे. याचप्रमाणे खो-खो संदर्भातही लीग आयोजित करण्याची योजना आहे. त्यामुळे शतकाकडे वाटचाल करणारी हिंद करंडक स्पर्धा येत्या काही वर्षांत शालेय स्तरावरील व्यावसायिक स्वरूप धारण करू शकेल.
मातब्बर कबड्डीपटूंची कार्यशाळा
सदानंद शेटय़े, मधू पाटील, शेखर शेट्टी, वसंत सूद, तारक राऊळ, सीताराम साळुंके, हनुमंत महाडिक, सुनील जाधव, गजानन भोईटे, रवींद्र करमळकर, रामचंद्र जाधव, संजय सूर्यवंशी, विलास जाधव, गौरव शेट्टी, माया आक्रे-मेहेर, चित्रा नाबर, क्रांती नाबर, शैला रायकर, छाया बांदोडकर, अरुणा चव्हाण, ग्रेटा डिसोझा, मुमताज सत्तारी, वनिता तांडेल, छाया देसाई, भारती विधाते, मनीषा गावंड, वीणा खवळे, मेघाली कोरगावकर, लता पांचाळ, तृप्ती सुवर्णा, गौरी वाडेकर, स्नेहल साळुंके, सुवर्णा बारटक्के अशा अनेक गाजलेल्या कबड्डीपटूंना शालेय वयात घडवण्यात हिंद करंडकाचा सिंहाचा वाटा आहे.
हिंद करंडकाची रचना
रवींद्रनाथ टागोर यांचे शिष्य विनायकराव मसोजी यांच्याकडून हिंद करंडकाची मातीची हुबेहूब प्रतिमा करून घेण्यात आली होती. ती अत्यंत कल्पकरीत्या साकारण्यात आली होती. या कलाकृतीला मूर्तिरूप देण्याचे कार्य भास्कर समेळ यांनी केले. साडेतीन फूट उंच आणि प्रत्येकी १३.५ किलो चांदीचा वापर यासाठी करण्यात आला आहे. करंडकाच्या रचनेत चारी दिशेला तोंडे केलेल्या चार हत्तींच्या पाठीवर एक उभा स्तंभ आहे. या स्तंभावर कुस्ती, भालाफेक, ढाल-तलवार, लंगडी, लाठीछूट, मल्लखांब, कबड्डी (हुतुतू), खो-खो या देशी खेळांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्याच्या वरील भागात मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे बोधचिन्ह आणि त्याखाली हिंद करंडक असे लिहिले आहे. मुलांसाठी असलेल्या करंडकात एक पुरुष खेळाडू हनुमान बैठकीत उजव्या हातात मशाल समोरच्या दिशेने धरून डावा हात चार सिंहांच्या दिशेला तोंडे असलेल्या स्तंभावर स्थित पृथ्वीच्या गोलावर ठेवलेल्या स्थितीत दर्शवण्यात आलेला आहे. खेळाडूच्या पाठीमागे पर्णाकृती चांदीच्या पत्र्यावर त्या वेळच्या भारताचा नकाशा आहे. मोतीराम नारायण देसाई टोपीवाले यांनी मुलांच्या करंडकासाठी निधी दिला. त्यामुळे त्याचे टोपीवाला हिंद करंडक असे नाव देण्यात आले. मुलींसाठी केलेल्या करंडकावर महिलांच्या खेळांची चित्रे आहेत आणि वरच्या बाजूला एक महिला तोंडाने बिगूल फुंकत आहे. बाकी रचना सारखीच आहे. उमाकांत श्रीरंग देसाई यांनी दिलेल्या या करंडकाचे राणी लक्ष्मीबाई हिंद करंडक असे नामकरण करण्यात आले.
मराठी शाळांचे प्रमाण रोडावल्यामुळे देशी खेळांमध्ये खेळणाऱ्या शाळांची संख्याही काही वर्षांपूर्वी कमी झाली; परंतु प्रो कबड्डीसारख्या लीगमुळे या खेळांना संजीवनी मिळाल्यामुळे शाळांची संख्या आता पुन्हा वाढू लागली आहे. – प्राचार्य डॉ. गो. वि. पारगावकर, मुंबई शारीरिक शिक्षण महाविद्यालय
इतिहासाच्या साक्षीदार फडणीस भगिनी
स्पध्रेच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या उद्घाटन सोहळ्याला नलिनी आणि शालिनी या फडणीस भगिनी आल्या होत्या. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या या बहिणींपैकी नलिनी पोदार शाळेत, तर शालिनी पार्ले टिळक शाळेत शिक्षिका होत्या. या दोन्ही बहिणी आपल्या शालेय वयात हिंद करंडक खेळल्या असल्यामुळे या कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी असंख्य आठवणींचा पट उलगडला.
