सिडनी  : चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळल्यामुळे स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांची झालेली हकालपट्टी व प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांचा राजीनामा या सर्व गोष्टींमधून सावरत असतानाच ऑस्ट्रेलियन क्रिकेटला आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटीपटू मार्क वॉ याने राष्ट्रीय संघाच्या निवड समितीतील हंगामी निवडकर्ता या पदाचा राजीनामा दिला आहे. तो आता दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांसाठी समालोचन करण्याची जबाबदारी हाताळणार आहे.

३१ ऑगस्टपर्यंत वॉ निवड समितीत कार्यरत असणार आहे. या वेळेत ऑस्ट्रेलियन संघ झिम्बाब्वे आणि इंग्लंड संघांचे दौरे करणार आहे. ‘‘निवड समितीतील गत चार वर्षे काम करणे, हा एक विशेष अनुभव होता. या काळात ऑस्ट्रेलियन संघाला मिळालेल्या यशाचा मी भागीदार होतो, ही गोष्ट फार अभिमानास्पद आहे,’’ असे वॉ म्हणाला. वॉ फॉक्स स्पोर्ट्स या वाहिनीसाठी काम करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त ऑस्ट्रेलियन राष्ट्रीय संघाच्या निवड समितीत ट्रेवर हॉर्न्‍स, ग्रेग चॅपेल आणि नवीन प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचा समावेश आहे.