‘दीवार’ चित्रपटामधील अमिताभ बच्चनच्या शैलीमध्ये मार्लन सॅम्युअल्स पत्रकार परिषदेमध्ये बसला होता. त्याच्यातला ‘अँग्री मॅन’ मैदानावर जागृत झालाच होता. या आविर्भावातून ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है मार्लन सॅम्युअल्स’ असेच त्याला सामन्यानंतर सांगायचे असावे, असे वाटले. या वेळी त्याने टीकाकारांचा समाचार तर घेतलाच, पण हा विजय कॅरेबियन लोकांसह शेन वॉर्नलाही समर्पित केला.
‘‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यात माझी कामगिरी चांगली झाली नाही. त्या वेळी ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नने माझ्यावर खरपूस टीका केली होती. त्यामुळे हा विजय मी कॅरेबियनच्या लोकांसह वॉर्नलाही समर्पित करतो,’’ असे सॅम्युअल्स म्हणाला.

 

मार्क निकोलस यांच्याकडून सॅमीची दिलगिरी
पीटीआय, लंडन : कॅरेबियन खेळाडूंना बुद्धी कमी असते, अशा शब्दांत टिपण्णी करणारे इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू मार्क निकोलस यांनी वेस्ट इंडिजचा कर्णधार डॅरेन सॅमीकडे दिलगिरी प्रकट केली आहे.
ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी निकोलस यांनी आपल्या स्तंभात वेस्ट इंडिजच्या संघाविषयी केलेले भाष्य हे अतिशय वाईट होते, असे सांगताना सॅमी अतिशय संतप्त आणि भावुक झाला होता. याबाबत निकोलस आपल्या बचावात म्हणाले की, ‘‘वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना मेंदू नसलेले असे मला अजिबात म्हणायचे नव्हते.’’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या सॅम्युअल्सला दंड
पीटीआय, कोलकाता
वेस्ट इंडिजच्या ट्वेन्टी-२० विश्वविजेतेपदाचा नायक ठरलेल्या मार्लन सॅम्युअल्सला सामन्याच्या मानधनापैकी ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. ईडन गार्डन्सवरील अंतिम सामना जिंकल्यानंतर अर्वाच्य भाषा वापरल्याबद्दल त्याला ही शिक्षा झाली आहे.
आयसीसीच्या आचारसंहितेमधील २.१.४ या कलमाचा सॅम्युअल्सने भंग केला. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान वादग्रस्त किंवा अपमानास्पद पद्धतीने भाषा किंवा कृती केल्याबद्दल हा कलम लागू होतो. अंतिम षटकात वेस्ट इंडिजने इंग्लंडचे आव्हान यशस्वी पेलल्यानंतर उत्साहाच्या भरात सॅम्युअल्सने बेन स्टोक्सच्या दिशेने पाहात अर्वाच्य भाषा वापरली. आयसीसीचे सामनाधिकारी रंजना मदगुले यांच्यासमोर झालेल्या सुनावणीप्रसंगी सॅम्युअल्सने आपली चूक कबूल केली.