Marnus Labuschagne: ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन आपल्या फलंदाजीसाठी ओळखला जातो. दरम्यान संघाला गरज असताना तो गोलंदाजी देखील करताना दिसतो. सध्या तो केएफसी टी-२० लीग स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या स्पर्धेत मार्नस लाबुशेन रेडलँड्स संघाकडून खेळतोय. या संघाकडून खेळताना त्याने फलंदाजीसह गोलंदाजीतही दमदार कामगिरी केली आहे. आधी क्वीन्सलँड संघाविरुद्ध खेळताना त्याने दमदार शतक झळकावलं होतं. आता व्हॅलीज संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्याने हॅटट्रिक घेत संघाला विजय मिळवून दिला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, उजव्या हाताचा लेग स्पिनर मार्नस लाबुशेन एकापाठोपाठ एक ३ फलंदाजांना बाद करून माघारी धाडत आहे.
या सामन्यात क्वीन्सलँड संघाकडून प्रथम फलंदाजी करताना रेडलँड्स संघाने २० षटकांअखेर ६ गडी बाद १९१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या व्हॅलीज संघाचा डाव १५० धावांवर आटोपला. यासह हा सामना रेडलँड्सने ४१ धावांनी आपल्या नावावर केला.
या सामन्यात १९२ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या व्हॅलीज संघाला १५ व्या षटकात मार्नस लाबुशेनने मोठे धक्के दिले. या षटकातील शेवटच्या चेंडूवर मार्नस लाबुशेनने टी मॉरिसला बाद करत पहिली विकेट मिळवली. मॉरिस १३ चेंडूत १७ धावा करत माघारी परतला. त्याला लाबुशेनने यष्टिरक्षकाच्या हातून झेलबाद करत माघारी धाडलं.
त्यानंतर १८ व्या षटकातील पाहिल्याच चेंडूवर त्याने सी बॉयसला बाद करत माघारी धाडलं. तो ८ चेंडूत ७ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रॉयस देखील दिलेल्या धावांचा पाठलाग करू शकला नाही. तो मार्नस लाबुशेननच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला. त्याला बाद करण्यासाठी खेळाडूने सीमारेषेवर भन्नाट झेल टिपला गेला. यासह त्याने आपली टी -२० कारकिर्दीतील पहिलीच हॅट्ट्रिक घेतली.