नेयमारसह पाच जणांना अतिरिक्त वेळेत मैदानाबाहेर काढण्यात आल्यानंतर मार्सेइलने कट्टर प्रतिस्पर्धी पॅरिस सेंट-जर्मेनचा १-० असा पराभव केला. गेल्या नऊ वर्षांतील मार्सेइलचा हा पॅरिस सेंट-जर्मेनवरील पहिला विजय ठरला. फ्लोरियन थॉविनचा (३१व्या मि.) गोल मार्सेइलच्या विजयात निर्णायक ठरला.

अल्वारो गोंझालेझशी अतिरिक्त वेळेत झालेल्या बाचाबाचीत पंचांनी नेयमार व अन्य चार जणांना लाल कार्ड दाखवत मैदानाबाहेर धाडले. गोंझालेझच्या डोक्यावर नेयमारने प्रहार केल्याचे व्हिडीयो चित्रीकरणामध्ये नंतर दिसून आले. त्याने वर्णद्वेषी शेरेबाजी के ल्याचा आरोप नेयमारने केला आहे. ‘‘मूर्ख माणसाच्या डोक्यावर आघात केल्याचा मला कोणताही पश्चात्ताप झालेला नाही,’’ असे नेयमारने नंतर ‘ट्वीटर’वर म्हटले आहे.