अहमदाबाद : एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी न्यूझीलंडने श्रीलंकेला नमवल्यामुळे अफगाणिस्तानचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. अफगाणिस्तानचा अखेरचा साखळी सामना आज, शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात तब्बल ४३८ धावांनी विजय मिळवता आला, तरच अफगाणिस्तानला निव्वळ धावगतीच्या बाबतीत न्यूझीलंडला मागे टाकता येईल.
हेही वाचा >>> World Cup 2023: उपांत्य फेरीसाठी न्यूझीलंड मजबूत स्थितीत, पाकिस्तान संघासाठी काय आहे समीकरण? जाणून घ्या
भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांनी उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. चौथ्या स्थानासाठी अफगाणिस्तानसह पाकिस्तान व न्यूझीलंड संघ शर्यतीत आहेत. मात्र, न्यूझीलंडने श्रीलंकेचा सहज पराभव केल्यामुळे आता अफगाणिस्तानसमोर अशक्यप्राय आव्हान आहे. पाकिस्तान व न्यूझीलंडच्या तुलनेने अफगाणिस्तानची निव्वळ धावगती फारच कमी आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला आगेकूच करणे फार अवघड जाणार आहे. असे असले तरी अफगाणिस्तानचा स्पर्धेची विजयी सांगता करण्याचा प्रयत्न असेल.
अफगाणिस्तानने आपल्या चमकदार कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी आठपैकी चार सामने जिंकले आहेत. इंग्लंड व पाकिस्तान संघांना पराभूत केल्यानंतर हशमतुल्ला शाहिदीच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धही विजयाची सुवर्णसंधी होती. मात्र, ग्लेन मॅक्सवेलचा झंझावात रोखण्यात अफगाणिस्तानचे गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे अफगाणिस्तानला पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे शाहिदी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा प्रयत्न करेल.
’ वेळ : दुपारी २ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस १, २, १ हिंदी, हॉटस्टार अॅप