मँचेस्टर : खेळाडूंच्या दुखापतींनी त्रस्त असलेल्या भारतासमोर संघनिवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातच इंग्लंडविरुद्ध आज, बुधवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात विजय महत्त्वाचा असल्याने भारताचा आता खऱ्या अर्थाने कस लागणार आहे. मँचेस्टरच्या ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ मैदानावर होणाऱ्या या सामन्यात पावसाच्या व्यत्ययाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

शुभमन गिलच्या नवनेतृत्वाखाली भारतीय संघाने या मालिकेत सर्वांना प्रभावित केले आहे. मात्र, मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ करता न आल्याचा त्यांना फटका बसला आहे. त्यामुळेच भारतीय संघ पाच सामन्यांच्या या मालिकेत आता १-२ असा पिछाडीवर आहे. २००७ सालानंतर प्रथमच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकायची झाल्यास भारताला उर्वरित दोनही सामने जिंकावे लागणार आहे.

लीड्स येथील पहिल्या कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. या सामन्यात तळाच्या फलंदाजांनी निराशा केली होती. त्यामुळे फलंदाजीतील खोली वाढविण्याच्या दृष्टीने भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यापासून तीन अष्टपैलू खेळाडूंना खेळविण्यास पसंती दिली. रवींद्र जडेजाच्या साथीने वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी यांना खेळविण्यात आले. मात्र, आता गुडघ्याच्या दुखापतीमुळे नितीशला उर्वरित दोन कसोटी सामन्यांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे भारताला संघरचनेत बदल करणे भाग पडणार आहे. नितीशच्या जागी शार्दूल ठाकूरला खेळविण्याचा पर्याय भारताकडे असला, तरी त्यामुळे फलंदाजी काहीअंशी कमकुमवत होण्याची भीती आहे. अशात भारतीय संघ एक अतिरिक्त फलंदाज खेळविण्याबाबत विचार करू शकेल.

साईचे पुनरागमन?

लीड्समध्ये भारतीय संघाने साई सुदर्शनला तिसऱ्या, तर करुण नायरला सहाव्या क्रमांकावर खेळवले होते. त्यानंतर दुसऱ्या कसोटीपासून साईला वगळून करुणला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्यामुळे मँचेस्टर कसोटीत साईच्या पुनरागमनाची शक्यता वाढली आहे. या परिस्थितीत करुणचे संघातील स्थान कायम राहणार का, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

अर्शदीप, आकाश मुकणार

हाताच्या दुखापतीमुळे अर्शदीप सिंग, तर स्नायूच्या दुखापतीमुळे आकाश दीप चौथ्या सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे भारतासमोर गोलंदाजीबाबतही प्रश्न निर्माण झाला आहे. भारताला प्रसिध कृष्णा आणि नवोदित अंशुल कम्बोज यांच्यापैकी एकाला संधी द्यावी लागेल. प्रसिधला या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींत संधी मिळाली, पण तो छाप पाडण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे, अंशुलने देशांतर्गत स्पर्धा आणि भारत ‘अ’ संघाकडून चांगली कामगिरी केली असली, तरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नाही. अशात संघनिवड करताना कर्णधार शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांना काही अवघड निर्णय घ्यावे लागणार आहेत. दुखापती आणि सामन्याचे महत्त्व लक्षात घेता तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा या सामन्यात खेळणार हे मात्र निश्चित आहे.

वेळ : दुपारी ३.३० वा.

थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस टेन १, ३, जिओहॉटस्टार ॲप.

पंतच यष्टिरक्षक

गेल्या कसोटी सामन्यात यष्टिरक्षण करताना ऋषभ पंतच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे मँचेस्टर येथे आजपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळवून यष्टिरक्षणाची धुरा ध्रुव जुरेलकडे सोपवली जाऊ शकेल अशी चर्चा होती. मात्र, पंत पूर्णपणे तंदुरुस्त असून तोच यष्टिरक्षण करणार असल्याचे कर्णधार शुभमन गिलने स्पष्ट केले आहे. कसोटीच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने याबाबतची माहिती दिली. पंतने सोमवारी यष्टिरक्षणाचा सराव केला. यात त्याला फारशी अडचण जाणवली नाही. त्यामुळे तो कसोटीतही ही जबाबदारी पार पाडू शकेल हा विश्वास संघ व्यवस्थापनाला मिळाला आहे.

बशीरच्या जागी डॉसन

कसोटीत मालिकेत २-१ अशा आघाडीवर असलेल्या इंग्लंडने संघात केवळ एक बदल केला आहे. ऑफ-स्पिनर शोएब बशीर बोटाच्या दुखापतीमुळे उर्वरित मालिकेत खेळू शकणार नाही. मँचेस्टर कसोटीसाठी त्याच्या जागी डावखुरा फिरकीपटू लियान डॉसनला संधी मिळणार असल्याचे इंग्लंडने स्पष्ट केले आहे. डॉसन तब्बल आठ वर्षांच्या अंतराने कसोटी सामना खेळेल. इंग्लंडच्या फलंदाजीची भिस्त जो रूट, हॅरी ब्रूक आणि जेमी स्मिथ यांच्यावर असेल. तसेच गेल्या सामन्यानंतर नऊ दिवसांची विश्रांती मिळाल्याने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला सलग दुसरा कसोटी सामना खेळणे शक्य होणार आहे. सलामीवीर झॅक क्रॉलीच्या कामगिरीची चिंता मात्र कायम आहे.

संघ : भारत : शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, करुण नायर, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, ध्रुव जुरेल, शार्दूल ठाकूर, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, अंशुल कम्बोज.

इंग्लंड (अंतिम ११) : बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, लियाम डॉसन.

‘ओल्ड ट्रॅफर्ड’ नकोसा इतिहास

० : भारतीय संघाने मँचेस्टरच्या ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ मैदानावर अद्याप एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. या मैदानावरील नऊपैकी चार कसोटी सामन्यांत भारतीय संघ पराभूत झाला असून पाच सामने अनिर्णित राहिले आहेत.

११ : भारतीय संघ तब्बल ११ वर्षांनी ‘ओल्ड ट्रॅफर्ड’वर कसोटी सामना खेळणार आहे. याआधी २०१४ मध्ये खेळलेल्या सामन्यात भारतीय संघ अवघ्या तीन दिवसांत डावाने पराभूत झाला होता.

३५ : ‘ओल्ड ट्रॅफर्ड’च्या मैदानावर भारताकडून अखेरचे कसोटी शतक सचिन तेंडुलकरने ३५ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९० मध्ये साकारले होते. सचिनने त्यावेळी नाबाद ११९ धावांची खेळी केली होती.

१४ : इंग्लंडने ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ मैदानावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या मैदानावरील गेल्या २५ वर्षांत इंग्लंडने एकूण २० कसोटी सामने खेळले असून यापैकी १४ जिंकले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खेळपट्टीबाबत : ‘ओल्ड ट्रॅफर्ड’ची खेळपट्टी पूर्वी वेगवान गोलंदाजीसाठी अनुकूल मानली जात होती. मात्र, काही वर्षांपूर्वी या स्टेडियमची रचना बदलण्यात आली. त्यानंतर येथील खेळपट्ट्यांतही मोठा बदल झाला आहे. आता फलंदाजांना धावा करणे सोपे जात आहे.