सेंच्युरियन : एकदिवसीय विश्वचषकाने हुलकावणी दिल्याच्या कटू आठवणींना मागे सोडून आता दक्षिण आफ्रिकेत ऐतिहासिक यश प्राप्त करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजयाची ३१ वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवण्यासाठी उत्सुक आहे. उभय संघांतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आज, मंगळवारपासून सुरुवात होणार आहे.

भारतीय संघ १९९२ पासून नवव्यांदा दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र, भारताला अद्याप एकदाही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका विजय साजरा करता आलेला नाही. त्यामुळे यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला इतिहास रचण्याची संधी आहे.

Dinesh Karthik Says I won't be surprised if he crosses the 300 run mark in IPL
IPL 2024 : आयपीएलमध्ये लवकरच ३०० धावांचा टप्पा पार होणार, ‘या’ दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: धोनीचा अद्भुत षटकार! संपूर्ण कारकिर्दीत माहीने पहिल्यांदाच लगावला भन्नाट शॉट; एबी-सूर्यालाही विसराल
Which teams will qualify for playoffs
IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
In Vidarbha thousands of hectares of orchards and crops were destroyed due to unseasonal rains
विदर्भात हजारो हेक्टरवरील फळबागा, पिकांची नासाडी; तिसऱ्या दिवशीही अवकाळीचे तांडव

सेंच्युरियन येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांवर पावसाचे सावट आहे. परंतु त्यानंतरचे तीन दिवस हवामानात सुधारणा अपेक्षित आहे. सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. खेळपट्टीकडून चेंडूला अतिरिक्त गतीही मिळते. त्यातच ढगाळ वातावरण राहिल्यास दोन्ही संघांतील फलंदाजांची कसोटी लागेल.

हेही वाचा >>> Rohit Sharma: वर्ल्ड कप पराभवानंतर टीम इंडिया मोठ्या विजयासाठी आतुर, रोहित म्हणाला, “विश्वचषकातील दुःख …”

कर्णधार रोहितसाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकेल. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन (१९९२), सचिन तेंडुलकर (१९९६) आणि सौरव गांगुली (२००१) या कर्णधारांना दक्षिण आफ्रिकेत यश मिळवता आले नाही. राहुल द्रविड (२००६-०७), महेंद्रसिंह धोनी (२०१०-११ व २०१३-१४) आणि विराट कोहली (२०१८-१९ व २०२१-२२) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले. परंतु यापैकी एकालाही दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आली नाही. आता ही कामगिरी करण्याची रोहितकडे संधी आहे.

दुसरीकडे, टेम्बा बव्हुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा मायदेशातील वर्चस्व कायम राखण्याचा प्रयत्न असेल. कसोटी मालिकेत सर्वोत्तम कामगिरी करता यावी यासाठी भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या काही प्रमुख खेळाडूंना मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी विश्रांती दिली होती. त्यामुळे दोन्ही संघांचे खेळाडू ताजेतवाने होऊन मैदानात उतरतील.

रोहित, कोहलीवर भिस्त

भारताच्या अव्वल पाचपैकी यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर या तीन फलंदाजांना दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या अनुभवी फलंदाजांची कामगिरी भारतासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. कोहलीने आफ्रिकेतील सात कसोटीत दोन शतके आणि तीन अर्धशतके केली आहेत. तसेच सहाव्या क्रमांकावर केएल राहुल खेळणे अपेक्षित असून तो यष्टिरक्षणाची धुराही सांभाळेल. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने यापूर्वी केवळ एकदाच तीनपेक्षा खालील क्रमांकावर फलंदाजी केली आहे. त्याच्यासाठीही हा नवा अनुभव असेल. रवींद्र जडेजाच्या रूपात एकमेव फिरकी गोलंदाज खेळण्याची शक्यता असल्याने रविचंद्रन अश्विनला संघाबाहेर बसावे लागेल. वेगवान गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि मुकेश कुमार यांच्यावर असेल.

रबाडा, यान्सनवर नजर

* भारतीय फलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या कगिसो रबाडा, मार्को यान्सन, लुन्गी एन्गिडी आणि जेराल्ड कोएट्झी या वेगवान माऱ्याविरुद्ध धावा करण्याचे आव्हान असणार आहे.

* रबाडाने आतापर्यंत भारताविरुद्ध १२ कसोटीत ४४ बळी मिळवले आहेत. तसेच डावखुऱ्या यान्सनमध्ये चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे. त्यामुळे विशेषत: या दोघांच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

* या वेगवान गोलंदाजांना केशव महाराजच्या फिरकीची साथ मिळेल. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी कागदावर तितकीशी भक्कम वाटत नाही.

* या मालिकेनंतर निवृत्त होणारा डीन एल्गर आणि कीगन पीटरसन यांनी अलीकडच्या काळात फार क्रिकेट खेळलेले नाही.

* बव्हुमा आणि एडीन मार्करम सध्या लय मिळवण्यासाठी झगडत आहेत. अशात एकदिवसीय मालिकेत चमक दाखवणाऱ्या टोनी डी झोर्झीवरील जबाबदारी वाढणार आहे.

आतापर्यंत जे जमले नाही, ते करण्याचे लक्ष्य

सेंच्युरियन : दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका खेळलेल्या अन्य भारतीय संघांना जे जमले नाही, ते करण्याचे आमचे लक्ष्य असल्याचे भारताचा कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीच्या पूर्वसंध्येला म्हणाला.

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदाच्या दोन सामन्यांच्या मालिकेत दमदार कामगिरी करून इतिहास रचण्याची रोहित आणि त्याच्या संघाला संधी आहे. ‘‘यापूर्वी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केलेल्यांना जे जमले नाही, ते आम्हाला करून दाखवायचे आहे,’’ असे रोहितने नमूद केले.  तसेच ३६ वर्षीय रोहितने आपल्या भविष्याबाबत बोलणे टाळले. ‘‘माझ्यासमोर जे क्रिकेट आहे ते खेळण्याचा आणि खेळाचा आनंद घेण्याचा माझा प्रयत्न आहे,’’ असे रोहितने सांगितले. त्याचप्रमाणे केएल राहुल पहिल्या कसोटीत यष्टिरक्षणाची धुरा सांभाळणार असल्याचे संकेतही रोहितने दिले. मात्र, यापुढे यष्टिरक्षक म्हणूनच खेळायचे की ही जबाबदारी काही सामन्यांसाठीच पार पाडायची, याबाबतचा निर्णय स्वत: राहुलच घेऊ शकतो, असेही रोहितने स्पष्ट केले.

वेळ : दु. १.३० वा. ल्ल  थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, हॉटस्टार अ‍ॅप.