Matthew Breetzke World Record: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने आफ्रिकेने जिंकत मालिका आपल्या नावे केली आहे. २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच इंग्लंडविरूद्ध इंग्लंडमध्ये वनडे मालिका विजय मिळवला आहे. दरम्यान आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रिट्झकेने वनडेमधील आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर, दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून फलंदाजांनी शानदार कामगिरी करत ५० षटकांत एकूण ३३० धावा केल्या. मारक्रम आणि रिकल्टन यांनी संघाला चांगली सुरूवात करून दिली. मारक्रमने ४९ धावा तर रिकल्टन ३५ धावा करत बाद झाले. यानंतर कर्णधार तेम्बा बावूमा ४ धावा करत बाद झाला. पण यानंतर आलेल्या ब्रिट्झकेने ८५ धावांची महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
मॅथ्यू ब्रिट्झकेची वादळी कामगिरी सुरूच
मॅथ्यू ब्रिट्झकेने त्याच्या डावाच्या सुरुवातीपासूनच वादळी फलंदाजी केली. त्याने ७७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली. अवघ्या काही धावांसाठी त्याचं शतक हुकलं. पण ब्रिट्झकेने अर्धशतक करताच मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
ब्रिट्झकेचं हे वनडे क्रिकेटमधील सलग पाचवं अर्धशतक होतं. त्याच्या वनडे क्रिकेटमधील पदार्पणानंतर त्याला आतापर्यंत पाच सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने पाचही सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली. ब्रिट्झके त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या पाच एकदिवसीय सामन्यांमध्ये ५०+ धावा करणारा एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील पहिला फलंदाज बनला आहे. यासह आता त्याने हा ऐतिहासिक विश्वविक्रम रचला आहे.
मॅथ्यू ब्रिट्झकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात त्याने १५० धावा केल्या. यानंतर, त्याने पाकिस्तानविरुद्ध दुसऱ्या सामन्यात ८३ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात ५७ आणि ८८ धावा केल्या. आता इंग्लंडविरुद्धही त्याचा जबरदस्त फॉर्म कायम राहिला आणि त्याने गोलंदाजांची शाळा घेत ८५ धावांची खेळी खेळली.
भारताच्या नवज्योत सिंग सिद्धूचा विक्रम ब्रिट्झकेने मोडला
भारताच्या नवजोत सिंग सिद्धूने त्याच्या कारकिर्दीत अशीच कामगिरी केली होती. त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याने पहिल्या चार डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावा केल्या. पण पहिल्या दोन सामन्यांनंतर, सिद्धूने तिसऱ्या सामन्यात फलंदाजी केली नाही. यामुळे त्यांनी पहिल्या पाच सामन्यात ५० अधिक धावा करण्याचा विक्रम केला होता. आता ब्रिट्झकेने हा विक्रम मोडत सलग पाच सामन्यांमध्ये ५० अधिक धावा केल्या आहेत.
मॅथ्यू ब्रिट्झके हा एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या कारकिर्दीच्या पहिल्या पाच डावांनंतर सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही बनला आहे. पदार्पणापासून त्याने पाच डावांमध्ये एकूण ४६३ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. या कामगिरीसह त्याने टॉम कूपरचा विक्रम मोडला आहे. कूपरने पहिल्या पाच एकदिवसीय डावांनंतर एकूण ३७४ धावा केल्या होत्या.