सलामीवीर मयांक अग्रवालच्या आक्रमक शतकी खेळाच्या जोरावर भारत अ संघाने तिरंगी मालिकेत आणखी एका विजयाची नोंद केली आहे. इंग्लंड लायन्स संघावर १०२ धावांनी मात करत भारताने या मालिकेतला दुसरा विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी केल्यानंतर मयांक अग्रवालच्या खेळीच्या जोरावर भारत अ संघाने ५० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात ३०९ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंड लायन्सचा संघ ४१.३ षटकात २०७ धावांवर माघारी परतला. मुंबईकर शार्दुल ठाकूरने ५३ धावांत ३ गडी बाद केले.

मयांक अग्रवालच्या ११२, शुभमन गिलच्या ७२ आणि हनुमा विहारीच्या ६९ धावांनी भारतीय संघाच्या डावाला आकार दिला. मुंबईकर पृथ्वी शॉला आजच्या सामन्यात भारतीय संघामध्ये जागा दिली नव्हती, त्याजागी शुभमन गिलला सलामीला फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. या संधीचा पुरेपूर फायदा घेत गिलने अर्धशतकी खेळी केली. मयांक अग्रवालचं या स्पर्धेतलं हे तिसरं शतक ठरलं. आपल्या शतकी खेळीत मयांक अग्रवालने १० चौकार आणि ४ षटकार लगावले.

यानंतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या माऱ्यासमोर इंग्लंडचा डाव कोलमडला. इंग्लंड लायन्स संघाचा एकही फलंदाज मोठी भागीदारी रचण्यामध्ये अयशस्वी ठरला, एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत राहिल्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवणं सोपं झालं. शार्दुल ठाकूरने सामन्यात ३ बळी घेतले, त्याला खलिल अहमदने २ बळी घेत चांगली साथ दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.