भारत-द. आफ्रिका कसोटी मालिका
नवी दिल्ली : सलामीवीर मयांक अगरवाल त्याचा आदर्श क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याच्याप्रमाणे निर्भयतेने फलंदाजी करतो, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने व्यक्त केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पणात दोन अर्धशतके साकारल्याने मयांकने लक्ष वेधून घेतले होते; परंतु आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साकारलेल्या द्विशतकी (२१५) खेळीमुळे त्याने भारतीय संघातील स्थान पक्के केले आहे, असे मत माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने व्यक्त केले आहे.
‘‘मयांक हा जिगरबाज फलंदाज आहे. खेळाडू बहुतांशी वेळा स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगळ्या पद्धतीने खेळतात; परंतु मयांक असा भेदभाव न करता सारख्याच दृष्टिकोनातून खेळतो. मानसिक कणखरता आणि स्थर्य ही त्याची बलस्थाने आहेत. त्याचा आवडता खेळाडू सेहवागप्रमाणेच तो निर्भयपणे खेळतो,’’ असे लक्ष्मणने सांगितले.
देशांतर्गत क्रिकेटमधील अनुभव मयांकसाठी उपयुक्त ठरत आहे. आपल्याकडून केल्या जाणाऱ्या अपेक्षांची त्याला जाणीव असते, असे हरभजनने सांगितले. ‘‘चेंडू बॅटवर येत असताना मयांक योग्य पद्धतीने पुढे येतो आणि रिव्हर्स स्वीपचा फटकाही तो खुबीने खेळतो. तो मेहनती खेळाडू आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये बरीच वर्षे खेळताना तो खूप शिकला आहे,’’ असे हरभजनने सांगितले.
‘‘खेळाडूला जेव्हा आपले संघातील स्थान आणि भूमिका याविषयी खात्री असते, तेव्हा तो आपल्या कामगिरीकडे योग्य पद्धतीने लक्ष केंद्रित करतो. मयांकने आपल्या नेहमीच्याच शैलीत पहिल्या कसोटीत फलंदाजी केली,’’ असे हरभजनने सांगितले.