बहुचर्चित मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) निवडणुकीची रंगत अगदी लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुकीसारखीच होती. मतदान कक्षाबाहेर गटांच्या उमेदवारांची, कार्यकर्त्यांची, पाठीराख्यांची अमाप गर्दी होती, राजकीय नेत्यांनीही या निवडणुकीला उपस्थिती लावून मतदान केले आणि या निवडणुकीला राजकीय आखाडय़ाचे स्वरूप आले होते. एक दिवसाचा मतदारराजा मोठय़ा थाटात निवडणुकीला आला आणि आपल्या अमूल्य मताने त्याने नव्या कार्यकारिणीला जन्म दिला.
मतदान सुरू होण्यापूर्वीच विजय पाटील यांच्या ‘क्रिकेट फर्स्ट’ गटाने जोरदार ‘फील्डिंग’ लावली होती. पांढऱ्या शर्टात, गटाचा लोगो लावलेले जवळपास शंभर कार्यकर्ते मतदार कक्षाबाहेर उपस्थित होते. विजय पाटीलही आपल्या गटासह मतदारांची भेट घेत होते. दुसरीकडे स्वत:ला निवडणुक लढवता आली नसली तरी आपल्या गटाला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. रत्नाकर शेट्टी यांनीही आपल्या गटाला जिंकवण्यासाठी खास उपस्थिती लावली होती. बाळ म्हाडदळकर गटाचे रवी सावंत आपल्या उमेदवार आणि कार्यकर्त्यांसह मतदारांचे स्वागत करत होते. तिन्ही गटाचे प्रमुख एकाच वेळी उपस्थित असताना माहोल गरमागरमीचा होता. प्रत्येक जणाच्या हातात आपल्या गटाची यादी होती, त्यामुळे जो मतदार येईल त्याला ती यादी देऊन आम्हालाच मतदान करून जिंकून आणा, अशी याचना उमेदवार मतदारराजाकडे करत होते.
या निवडणुकीत वेगळाच रंग भरला तो विविध पक्षांतील राजकारण्यांनी. सचिन अहीर, नितीन सरदेसाई आणि जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक सुरू झाल्यावर अध्र्या तासात आपली उपस्थिती लावली. ३ वाजून ५० मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर पाच मिनिटांनी शरद पवार एमसीएमध्ये मतदानासाठी दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ ४ वाजून २० मिनिटांनी उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र आदित्य यांनी प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत ज्यांनी ही निवडणूक वेगळ्या अर्थाने गाजवली ते गोपीनाथ मुंडे दाखल झाले. पवार यांचे जवळचे मानले जाणारे डॉ. रत्नाकर शेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले. त्या वेळी आम्हालाच कोणी ‘शेट्टी’ भेटत नाही, असा विनोद त्यांनी केला आणि एकच हशा पिकला. मुंडेंच्या हातात या वेळी बाळ म्हाडदळकर गटाच्या उमेदवारांची यादी होती. मतदान करून आल्यावर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी पवार यांच्यावर शरसंधान केले. त्यानंतर तासभर कुणीही मोठी व्यक्ती फिरकली नाही. त्यानंतर तासाभराने भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी हजेरी लावली, रवी सावंत यांच्याशी त्यांनी हस्तांदोलन केले आणि रत्नाकर शेट्टींकडे आपला मोर्चा त्यांनी वळवला. त्यानंतर दहा मिनिटांनी पवारांनी पुन्हा प्रवेश करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) कार्यालय गाठले. हातात काही फायली घेत ते बीसीसीआयच्या कार्यालयात गेले आणि काही मिनिटांनी चेहऱ्यावर स्मित ठेवत बाहेर आले.
मतदानासाठी कायपण!
निवडणुकीमध्ये प्रत्येक मत महत्त्वाचे असते, पण याची जाण काही वेळा मतदाराला नसते. पण एमसीएच्या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी दादर पारसी कॉलनी क्बलचे मतदार तेहमूल दहिवाला हे चक्क रुग्णवाहिकेतून आले. ७० वर्षीय दहिवाला यांना चालणे शक्य नव्हते, त्यामुळेच खुर्चीवरून त्यांनी मतदार कक्ष गाठला. याबाबत सचिव पी. व्ही. शेट्टी म्हणाले की, दहिवाला यांना चालता येत नसल्याने त्यांनी माझ्याकडे रुग्णवाहिकेची सोय करावी, अशी विनंती केली होती आणि त्यानुसार त्यांना रुग्णवाहिकेची सोय देण्यात आली. कारण आमच्यासाठी प्रत्येक मतदार आणि मत महत्त्वाचे आहे.
