Akash Kumar Chaudhary: भारतात रणजी ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मेघालय विरुद्ध अरुणाचल प्रदेश या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात आकाश कुमार चौधरीने विक्रमी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये मोठ मोठे फटके फार क्वचितच पाहायला मिळतात. पण आकाश कुमार चौधरीने फलंदाजी करताना सलग ८ चेंडूत ८ षटकार मारले आहेत. यासह प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सलग ८ चेंडूंवर ८ षटकार मारणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी असा पराक्रम कुठल्याही फलंदाजाला करता आलेला नाही. इतर फलंदाजांनी लागोपाठ ६ षटकार खेचले आहेत, पण सलग ८ षटकार खेचण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी रवी शास्त्री आणि गॅरी सोबर्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लागोपाठ ६ षटकार खेचले होते.

प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतक

यासह त्याच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. ८ षटकार मारताच त्याने ११ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतकी खेळी करण्याचा विक्रम हा लीसेस्टरशायर संघाच्या वेन नाईटच्या नावावर होता. त्याने २०१२ मध्ये फलंदाजी करताना १२ चेंडूत ५० धावांची दमदार खेळी केली होती. तर क्लाइव इनमन यांनी १९६५ मध्ये फलंदाजी करताना अवघ्या १३ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं.

अरुणाचल प्रदेश संघाने उभारला धावांचा डोंगर

या सामन्यात आकाश कुमार चौधरी हा अरुणाचल प्रदेश संघाकडून ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने या डावात फलंदाजी करताना १४ चेंडूत ५० धावा चोपल्या. यासह मेघालयकडून फलंदाजी करताना अर्पित भटेवराने द्विशतकी खेळी केली. तर किशन आणि राहुल दलालने दमदार शतकं झळकावली. या खेळीच्या बळावर मेघालय संघाने ६२८ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर डाव घोषित केला.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या अरुणाचल प्रदेश संघातील फलंदाजांना देखील हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संपूर्ण डाव अवघ्या ७३ धावांवर आटोपला. या दमदार कामगिरीच्या बळावर मेघालय संघाने अरुणाचल प्रदेश संघावर ५५५ धावांची भलीमोठी आघाडी घेतली.