Michael Vaughan trolls Mohammad Hafeez on social media: सोशल मीडियावर क्रिकेटपटूंवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध असलेला इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने मोहम्मद हाफिजवर निशाणा साधला आहे. हाफिजने नुकतीच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीवर टीका केली होती. यानंतर वॉनने त्याला त्याच्याच स्टाइलमध्ये सांगितले की, मला हाफिजची ही गोष्ट आवडली नाही.

खरंतर, विराट कोहलीने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. विराटने १२१ चेंडूत नाबाद १०१ धावा केल्या होत्या, ज्याला पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने स्वार्थी म्हटले होते. तो म्हणाला की, कोहली संघाच्या गरजेपेक्षा वैयक्तिक कामगिरीला अधिक प्राधान्य देत आहे.
मायकेल वॉनने यावर प्रतिक्रिया देत याला ‘निंदनीय मूर्खपणा’ म्हटले आहे. कोहलीच्या डावाचा बचाव करताना तो म्हणाला की, कोलकात्याच्या ईडन गार्डन्सच्या या अवघड खेळपट्टीवर कोहलीची भूमिका महत्त्वाची होती.

हेही वाचा – NZ vs SL, World Cup 2023: न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

यानंतर वॉनने हाफिजचा फोटो पोस्ट करत लिहिले, हाफिज, हेच कारण आहे का तू कोहलीला फटकारतोस? वास्तविक, वॉनने कोहलीचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये विराट कोहलीने मोहम्मद हाफिजला क्लीन बोल्ड केले आहे. विराट कोहलीच्या ८ आंतरराष्ट्रीय विकेट्समध्ये हाफिजच्याही विकेट्सचा समावेश आहे.

मायकल वॉनने एक्सवर हा फोटो पोस्ट करताना वॉनने हाफिजवर ताशेरे ओढले आणि लिहिले, ‘मला दिसतंय मोहम्मद हाफिज, तुम्हाला विराट कोहलीने बोल्ड केले आहे. हेच कारण आहे का तुम्ही सतत त्याच्यावर टीका करत आहात?’ यानंतर त्याने डोळे मिचकावणारे दोन इमोजीही शेअर केले आहेत.

यानंतर वॉनने गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा हाफिजची मजा घेतली. यावेळी त्याने हाफिजचा क्लीन बोल्डचा व्हिडीओ पोस्ट केला आणि त्याला गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा दिल्या आणि लिहिले, ‘तुमचा दिवस चांगला जावो.’ येथे पुन्हा एकदा वॉनने डोळे मिचकावणारे दोन इमोजी शेअर केले आहेत.