फोर्डे (नॉर्वे) : भारताच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या मीराबाई चानू हिने वजन गट बदलल्यानंतरही जागतिक अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धेत विजयमंचावर पोहोचण्याची कामगिरी केली. तिने नॉर्वे येथे झालेल्या स्पर्धेत रुपेरी यश संपादन केले.

मीराबाईने नव्या ४८ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ८४ किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये ११५ किलो असे एकूण १९९ किलो वजन उचलले. तिला स्नॅचमध्ये संघर्ष करावा लागला. मीराबाई दोन वेळा ८७ किलो वजनाच्या प्रयत्नात अपयशी ठरली. क्लीन अँड जर्कमध्ये मात्र मीराबाईने तीनही प्रयत्न यशस्वी केले. याआधी क्लीन अँड जर्कमध्ये विश्वविक्रम नोंदविणाऱ्या मीराबाईने या वेळी १०९, ११२ आणि ११५ किलो असे वजन सहज उचलले. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळविताना मीराबाईने अखेरचा प्रयत्न ११५ किलोचाच यशस्वी केला होता.

मीराबाईचे जागतिक स्पर्धेतील हे तिसरे पदक ठरले. यापूर्वी २०१७ मध्ये सुवर्ण आणि २०२२ मध्ये रौप्यपदक मिळविले होते. अर्थात, ही दोन्ही पदके तिने ४९ किलो वजनी गटातून मिळवली होती.

‘‘विजयमंचावर येण्याचा मला आनंद आहे. या पदकाने पुढील वर्षासाठी खूप आत्मविश्वास मिळेल. आता प्रत्येक स्पर्धा ही लॉस एंजलिस ऑलिम्पिकच्या तयारीचा भाग असेल. कठोर मेहनत घेत देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे,’’ असे मीराबाई म्हणाली. उत्तर कोरियाच्या री सॉन्ग हिने (९१ आणि १२२) एकूण २१३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले. तिची ही कामगिरी विश्वविक्रमी ठरली. थायलंडची धान्याथोन सुक्चारोए (८८ आणि ११० किलो) एकूण १९८ किलो वजनासह कांस्यपदकाची मानकरी ठरली.