कुणाच्याही ध्यानीमनी नसताना २०१५च्या विश्वचषकामध्ये थेट उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्यात यशस्वी झालेला बांगलादेशचा संघ यंदाच्या विश्वचषकात कुठपर्यंत झेप घेतो, ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दर्जेदार फिरकीपटू आणि अष्टपैलू खेळाडू या बळावर बांगलादेशचा संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. केवळ कामगिरीतील सातत्य ही त्यांची प्रमुख अडचण असली तरी चार विश्वचषकांचा अनुभव असलेल्या चार अनुभवी खेळाडूंच्या बळावर बांगलादेश कोणताही चमत्कार करण्याची क्षमता राखून आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपेक्षित कामगिरी

२०१५मध्ये थेट उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारण्याची अफलातून कामगिरी करणाऱ्या बांगलादेश संघाला नेहमीच धक्कादायक कामगिरीसाठी ओळखले जाते. २०१७च्या आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीत तर २०१८च्या आशिया चषकात अंतिम फेरीपर्यंत मजल मारण्यात बांगलादेश संघाला यश आले होते. यंदा ते मागील विश्वचषकापेक्षाही अधिक दर्जेदार कामगिरी नोंदवण्यास उत्सुक आहेत. आतापर्यंतच्या विश्वचषकांमध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंडसारख्या अव्वल संघांना झटका देणाऱ्या बांगलादेशच्या संघाला विश्वचषकाचा दावेदार मानले जात नसले तरी त्यांनी उपांत्यपूर्व ते उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यास कुणालाही आश्चर्य वाटणार नाही.

बलस्थाने आणि कच्चे दुवे

कर्णधार मश्रफी मोर्तझा, मुशफिकर रहीम, शकिब अल हसन आणि तमिम इक्बाल या बांगलादेशचा आधारस्तंभ असलेल्या चारही खेळाडूंनी तिशी ओलांडली असल्याने त्यांचा हा अखेरचा विश्वचषक आहे. त्यामुळे हे चौघेही प्रमुख खेळाडू त्यांचा अनुभव पणाला लावून हा विश्वचषक यादगार करण्यावर भर देणार हे निश्चित आहे. बांगलादेशच्या या चौघा खेळाडूंचा चार विश्वचषकांचा अनुभव ही त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू राहणार आहे. त्याशिवाय गोलंदाज मुस्तफिझूर रहमान तर फलंदाजीत लिटन दास आणि सौम्य सरकार यांच्या कामगिरीवर बांगलादेशची वाटचाल निश्चित होणार आहे. फिरकी गोलंदाजी हे बलस्थान असलेल्या बांगलादेशाची फिरकी ही इंग्लंडच्या खेळपट्टय़ांवर फारशी प्रभावी ठरण्याची शक्यता नाही. त्यामुळे दर्जेदार जलद गोलंदाजांचा ताफा नसणे ही त्यांची दुबळी बाजू ठरू शकते. त्यामुळे बांगलादेशाला त्यांच्या अनुभवी फलंदाजीवरच अधिक अवलंबून राहावे लागणार आहे.

संकलन : धनंजय रिसोडकर

मराठीतील सर्व क्रिकेट वर्ल्ड कप 2019 बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Miracle expect from bangladesh cricket team in icc world cup
First published on: 17-05-2019 at 04:08 IST