भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने संघाची घोषणा केली असून, अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचं संघात पुनरागन झालं आहे. जवळपास वर्षभरानंतर स्टार्क वनडे खेळणार आहे. मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज मार्नस लबूशेनला संघातून वगळण्यात आलं आहे. लबूशेनचा क्वीन्सलँड संघातील सहकारी मॅट रेनशॉला वनडे संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. रेनशॉने याआधी फक्त कसोटीत ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे.

लबूशेन गेल्या १० वनडे डावात धावांसाठी संघर्ष करत होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत मॅट शॉर्ट दुखापतग्रस्त झाल्याने लबूशेनला संधी मिळाली मात्र त्याला या संधीचा फायदा उठवता आला नाही. वनडे संघातून डच्चू देण्यात आल्याने लबूशेन अॅशेस मालिकेसाठी शेफील्ड शिल्डचे सामने खेळून तयारी करू शकतो.

रेनशॉने ऑस्ट्रेलिया ए संघासाठी खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. सध्या तो मधल्या फळीत खेळत आहे मात्र अॅशेस मालिकेसाठी त्याचा सलामीवीर म्हणून विचार होऊ शकतो. कसोटी पदार्पणानंतर जवळपास दशकभरानंतर रेनशॉला वनडे पदार्पणाची संधी आहे. २०२२ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याला संघात सामील करण्यात आलं होतं मात्र अंतिम अकरात संधी मिळाली नव्हती.

पोटऱ्यांना झालेल्या दुखापतीतून सावरलेल्या जोश इंगलिसचं संघात पुनरागमन झालं आहे. अॅलेक्स कॅरे शेफील्ड शिल्डचा सामना खेळणार असल्यामुळे पहिली लढत खेळणार नाही. मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे ग्लेन मॅक्सवेलचा टी२० मालिकेसाठी विचार करण्यात आला नाही.

कॅमेरुन ग्रीन वनडे मालिकेत खेळणार आहे पण टी२० मालिकेसाठी त्याच्या नावाचा विचार झालेला नाही. आगामी अॅशेस मालिकेच्या पार्श्वभूमीवर बहुतांश खेळाडूंसाठी वर्कलोड मॅनेजमेंट करण्यात आलं आहे.

इंडिया ए संघाविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या कूपर कोनोलीने वनडे संघातलं स्थान कायम राखलं आहे. मिचेल ओवेनलाही वनडे पदार्पणाची संधी आहे.

पुढच्या वर्षी होणारा टी२० वर्ल्डकप लक्षात घेऊन संघाची रचना करण्यात आली आहे. खेळाडूंना दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ देण्यावर भर दिला आहे असं निवडसमितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली यांनी सांगितलं. भारतीय संघ या दौऱ्यात ३ वनडे आणि ५ टी२० सामने खेळणार आहे.

भारतानेही काही तासांपूर्वी संघनिवड जाहीर केली. भारताच्या वनडे संघाचं नेतृत्व शुबमन गिलकडे सोपवण्यात आलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली हे दोघेही संघात आहेत. श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली २०२७ वनडे वर्ल्डकप खेळणार का यासंदर्भात स्पष्टता नाही. टेस्ट संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेला शुबमन आता वनडेतही संघाची धुरा सांभाळणार आहे.

या मालिकेतील पहिला वनडे सामना १९ ऑक्टोबरला पर्थच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना २३ ऑक्टोबरला अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार आहे. तर मालिकेतील शेवटचा सामना २५ ऑक्टोबरला सिडनीच्या मैदानावर खेळवला जाईल.वनडे मालिका झाल्यानंतर दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरूवात होणार आहे. टी-२० मालिकेतील पहिला सामना २९ ऑक्टोबरला कॅनबरामध्ये खेळवला जाईल. तर दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये, तिसरा सामना २ नोव्हेंबरला होबार्टमध्ये, चौथा सामना ६ नोव्हेंबरला गोल्ड कोस्टमध्ये आणि मालिकेतील शेवटचा टी-२० सामना ८ नोव्हेंबरला ब्रिसबेनमध्ये खेळवला जाणार आहे.