Mitchell Starc Takes Suryakumar Yadavs Wicket Viral Video : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १७ मार्चपासून सुरु झालीय. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात विजय संपादन केलं आहे. आज विशाखापट्टणममध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा सामना खेळवला जात आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांची ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने दाणादाण उडवली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारताच्या आख्ख्या संघाला ११७ धावांवर गारद केलं. पण या इनिंगमध्येही सूर्यकुमार यादवला भोपळा फोडता आला नाही. त्यामुळे त्याच्यावर क्रिडाविश्वातून टीका होत आहे. स्टार्कने सूर्यकुमारला शून्यावर बाद केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातही सूर्यकुमारला धावांचा सूर गवसला नाही. स्टार्कने त्याला शून्यावर बाद करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. टी २० क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडणाऱ्या सूर्यकुमार यादवला वनडे क्रिकेटमध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागत आहे. आगामी होणाऱ्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर सूर्यकुमार यादव फॉर्ममध्ये येणे टीम इंडियासाठी अत्यंत महत्वाचं आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने या सामन्यातही भेदक गोलंदाजी केली. भारताच्या चार फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवण्यात स्टार्क यशस्वी झाला. भारतासाठी सलामीला मैदानात उतरलेल्या शुबमन गिलला भोपळाही फोडता आला नाही.
इथे पाहा व्हिडीओ
कर्णधार रोहित शर्माने १५ चेंडूत १३ धावा केल्या. रोहित आणि शुबमन दोघेही स्टार्कच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर विराट कोहलीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. विराटने ३५ चेंडूत ३१ धावा केल्या. तसंच सूर्यकुमार यादव या सामन्यातही शून्यावर बाद झाला. मागील सामन्यात धडाकेबाज खेळी करणारा के एल राहुल आजच्या सामन्यात फक्त ९ धावा करून माघारी परतला. हार्दिक पांड्यालाही धावांचा सूर गवसला नाही. हार्दिक एक धाव करून तंबूत परतला. त्यानंतर जडेजाने डाव सावरत १६ धावा केल्या. पण त्यालाही भारताच्या धावसंख्येचा आलेख चढता ठेवता आला नाही.