पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद इरफान रविवारी रात्री अचानक सोशल मिडियावर चर्चेत आला. त्याचा कार अपघातात मृत्यू झाल्याची बातमी काही प्रसारमाध्यमांनी दिली. त्यानंतर ट्विटरवर चाहत्यांनी ट्विट्सचा पाऊस पाडला. पण ही बातमी निव्वळ अफवा असून मोहम्मद इरफानने स्वत: हे वृत्त फेटाळून लावले. माझा कोणताही अपघात झालेला नाही. मी सुखरूप आहे, असे त्याने ट्विटरवरून स्पष्ट केले तसेच चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवू नका असे त्याने चाहत्यांना आवाहनही केले.

“कोणत्या तरी सोशल मीडिया आऊटलेटने माझा कार अपघातात मृत्यू झाल्याची तथ्यहीन बातमी पसरवली आहे. अशा चुकीच्या आणि खोट्या बातम्यांमुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला काल रात्रीपासून सारखे फोन येत आहेत. मी सगळ्यांना सागू इच्छितो की कृपया या अफवा पसरवणं थांबबा. असा कोणताही अपघात झालेला नाही. मी आणि माझे कुटुंब सुखरूप आहोत”, असे ट्विट त्याने केले.

३८ वर्षीय मोहम्मद इरफानने २०१० मध्ये इंग्लंड विरुद्धच्या वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. इरफानने पाकिस्तानकडून ६० वन डे, २२ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १०, वन डे कारकिर्दीत ८३ आणि टी-२० मध्ये १६ बळी टिपले आहेत. मार्च महिन्यात पाकिस्तानात झालेल्या PSL मध्ये इरफान ‘मुल्तान सुल्तान्स’ या संघाकडून खेळला होता. त्यावेळी त्याने चार गडी टिपले होते.