India vs England 5th Test, Mohammed Siraj Record: भारत आणि इंग्लंड पाचव्या कसोटी सामन्याचा थरार ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी केली. या सामन्यातून जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे मोहम्मद सिराजवर मोठी जबाबदारी होती. सिराजने पहिल्या डावात गोलंदाजी करताना ४ महत्वाचे गडी बाद केले. त्यामुळे इंग्लंडचा डाव अवघ्या २४७ धावांवर आटोपला. यासह मोहम्मद सिराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. यादरम्यान त्याने सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरचा हात कोणीच धरू शकत नाही. धावांचा डोंगर उभारण्याचा त्याने गोलंदाजी करताना विकेट्सही काढल्या. यादरम्यान त्याच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०१ गडी बाद करण्याची नोंद आहे. आता ४ गडी बाद करताच मोहम्मद सिराजने २०३ गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे. यासह भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो २३ व्या स्थानी पोहोचला आहे.

भारतीय संघासाठी सर्वाधिक गडी बाद करण्याच्या विक्रम हा अनिल कुंबळे यांच्या नावावर आहे. त्यांनी ९५३ गडी बाद केले आहेत. अनिल कुंबळे हे एकमेव भारतीय गोलंदाज आहेत. ज्यांनी ९०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठला आहे. दुसऱ्या स्थानी असलेल्या आर अश्विनने ७६५ गडी बाद केले आहेत. तर हरभजन सिंगच्या नावे ७०७ गडी बाद करण्याची नोंद आहे.

आता मोहम्मद सिराजने सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. मोहम्मद सिराज हा अँडरसन – तेंडुलकर ट्रॉफीत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सिराजने या मालिकेत आतपर्यंत १८ गडी बाद केले आहेत. अजूनही एक डाव शिल्लक आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.