Mohammed Kaif Statement on Axar Patel For Not Giving Vice Captaincy: आशिया चषक २०२५ साठी भारताचा संघ अखेरीस जाहीर झाला. संघ जाहीर होण्यापूर्वी कोणाला संधी मिळणार यावरून चर्चांना उधाण आलं होतं. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली संघात शुबमन गिलला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. यामुळे संघ पाहताच नव्या चर्चांना उधाण आलं आहे. शुबमन गिलला उपकर्णधारपद दिल्याने अक्षर पटेलकडून ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे, यामुळे भारताचा माजी खेळाडू मात्र चांगलाच वैतागला आहे.

आशिया चषकात भारतीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी शुबमन गिलवर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. अनेकांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की अक्षर पटेलची अशी काय चूक होती की त्याला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यात आलं आहे. सूर्या आणि त्याच्या नेतृत्वाखाली संघ चांगली कामगिरी करत होता.

माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफनेही या विषयावर आपले मत मांडले आहे. अक्षरला उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यापूर्वी त्याला याबद्दल माहिती दिली गेली असावी, अशी आशा व्यक्त केली आहे.

भारताचा माजी खेळाडूच्या अक्षर पटेलच्या बाजूने

मोहम्मद कैफने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं, “उपकर्णधारपदावरून काढून टाकण्यापूर्वी अक्षर पटेलला याबाबत माहिती दिली गेली असावी, आणि पत्रकार परिषदेद्वारे त्याला हे कळलं नसावं, अशी आशा करतो. अक्षरने उपकर्णधार असताना काहीच चुकीचं केलेलं नाही. त्यामुळे त्याला पदावर काढण्यामागचं कारण स्पष्ट केलंच पाहिजे.”

वर्षभराच्या कालावधीनंतर शुबमन गिलला भारताच्या टी-२० संघात स्थान दिलं गेलं आणि थेट उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या गेल्या टी-२० मालिकेत अष्टपैलू अक्षर पटेल भारतीय संघाचा उपकर्णधार होता. या मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली होती.

अक्षर पटेल त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे एकदिवसीय आणि टी-२० फॉरमॅटमधील एक महत्त्वाचा सदस्य बनला आहे. त्याने भारताकडून १४ कसोटी, ६८ एकदिवसीय आणि ७१ टी-२० सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने २२ डावांमध्ये ३५.८८ च्या सरासरीने ६४६ धावा, ४७ डावांमध्ये ७८३ धावा तर ४४ टी-२० सामन्यांमध्ये ५३५ धावा केल्या आहेत. अष्टपैलू अक्षर पटेलने गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. त्याने कसोटीच्या २७ डावांमध्ये ५५ विकेट्स, ६३ वनडे सामन्यांमध्ये ७२ विकेट्स आणि ६८ टी-२० सामन्यांमध्ये ७१ विकेट्स घेतल्या आहेत.