Mohammed Shami Fitness Update: भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील अखेरचे दोन कसोटी सामना मेलबर्न आणि सिडनीमध्ये खेळवले जाणार आहेत. यापूर्वी बीसीसीआयने मोहम्मद शमीबाबत मोठे अपडेट दिले आहेत. बीसीसीआयने सोमवारी भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या फिटनेसबाबत माहिती दिली आहे. मोहम्मद शमी टाचेच्या दुखापतीतून सावरला असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.

शमी दुखापतीतून सावरला असला तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी तो अजूनही तंदुरुस्त नसल्याचे बीसीसीआयने सांगितले. याच कारणामुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार नाही. बीसीसीआयने सांगितले की त्यांच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे वैद्यकीय पथक वेगवान गोलंदाजाच्या रिकव्हरी आणि पुनर्वसनावर लक्ष ठेवून आहे. शमी टाचेच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. पण त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीने तो त्रस्त आहे.

मोहम्मद शमीच्या गुडघ्याच्या दुखापतीबाबत बीसीसीआयने सांगितले की, ‘नोव्हेंबरमध्ये मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यात शमीने बंगालसाठी ४३ षटकं टाकली होती. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने नऊ सामने खेळले. याबरोबरच त्याने अनेक अतिरिक्त गोलंदाजी सत्रांमध्येही भाग घेतला. मात्र, गोलंदाजीच्या वर्कलोडमुळे त्याच्या सांध्यावर ताण पडला. त्यामुळे त्याच्या डाव्या गुडघ्याला सूज आली आहे. असे होण्याची शक्यता आधीपासूनच होती कारण बराच वेळ गोलंदाजी केल्यानंतर असं होतं.’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासह त्याच्या सध्याच्या फिटनेसवर बीसीसीआयने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘सध्याच्या वैद्यकीय मूल्यांकनानुसार, मोहम्मद शमीचा गुडघा बरा होण्यासाठी आणि गोलंदाजीचा भार उचलण्यास वेळ लागेल. याच कारणामुळे तो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या उर्वरित दोन सामन्यांसाठी तंदुरुस्त मानला गेला नाही., असे बीसीसीआयने सांगितले.