India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी ३७४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. ओव्हलच्या मैदानावर इतक्या मोठ्या आव्हानाचा यशस्पी पाठलाग केला नव्हता. त्यामुळे इंग्लंडला सामना जिंकण्यासाठी इतिहास घडवायचा होता. इंग्लंडचा संघ इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. पण भारतीय गोलंदाजांच्या दमदार गोलंदाजीच्या बळावर इंग्लंडचा संघ विजयापासून ६ धावा दूर राहिला.
प्रसिध कृष्णा – मोहम्मद सिराज खंबीरपणे उभे राहिले
पाचव्या कसोटीत भारतीय संघाच्या अंतिम अकरात मोठा बदल करण्यात आला होता. संघातील प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहला या सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी मोहम्मद सिराजवर होती. सिराजला साथ देण्यासाठी प्रसिध कृष्णाला अंतिम अकरात स्थान दिलं गेलं होतं. गेल्या सामन्यात अंशुल कंबोज संघात होता, पण त्याला आपली छाप सोडता आली नव्हती. प्रसिध कृष्णाला या मालिकेतील सुरूवातीच्या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे तो या महत्वाच्या सामन्यात सिराजला चांगली साथ देणार का? अर्शदीपसारखा डावखुऱ्या हाताचा वेगवान गोलंदाज असताना पुन्हा एकदा प्रसिध कृष्णा का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते. पण प्रसिधने सर्वांचे अंदाज खोटे ठरवले.
या सामन्यातील पहिल्या डावात गोलंदाजी करताना सिराजने १६.२ षटकात ८६ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. तर प्रसिध कृष्णाने १६ षटकात ६२ धावा करत ४ गडी बाद केले. दोघांनी मिळून पहिल्या डावात ८ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना या दोघांवर मोठी जबाबदारी होती. दुसऱ्या डावातही दोघांनी दमदार गोलंदाजी केली. दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना सिराजने ३०.१ षटक गोलंदाजी करत १०४ धावा खर्च केल्या आणि ५ गडी बाद केले. तर प्रसिध कृष्णाने २७ षटक टाकली आणि १२६ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. या दोघांनी दोन्ही डावात मिळून १७ गडी बाद केले. त्यामुळे ज्या गोलंदाजी आक्रमणावर प्रश्न उपस्थित केले जात होते, तेच गोलंदाज भारतीय संघासाठी विजयाचे हिरो ठरले.
पाचव्या दिवशी काय घडलं?
या सामन्यातील पाचव्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी अवघ्या ३५ धावांची गरज होते. तर ४ फलंदाज शिल्लक होते. त्यामुळे पारडं इंग्लंडच्या बाजूने झुकलेलं होतं. भारताकडून प्रसिध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी गोलंदाजी आक्रमणाची सुरूवात केली. सिराजने आधी जेमी स्मिथला बाद करत इंग्लंडला सर्वात मोठा धक्का दिला. इथून पुढे भारताला विजयासाठी ३ फलंदाजांना बाद करायचं होतं. सिराजने ओव्हरटनला पायचीत करत माघारी धाडलं. त्यानंतर जोश टंगला प्रसिध कृष्णाने त्रिफळाचित केलं. भारताला विजयासाठी एक गडी बाद करायचा होता. त्यावेळी एका हाताला दुखापत असतानाही ख्रिस वोक्स फलंदाजीला आला. संपूर्ण जबाबदारी गस एटकिंसनवर होती. ख्रिस वोक्स केवळ एक बाजू सांभाळण्यासाठी मैदानावर आला होता. शेवटी एटकिंसनने मोठे फटके मारून इंग्लंडला विजयाच्या जवळ पोहोचवलं. पण ७ धावांची गरज असताना, सिराजने त्याला त्रिफळाचित करत माघारी धाडलं.