Mohammed Siraj on 6 Wicket Haul vs Eng: भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटीत मोहम्मद सिराजने आपल्या भेदक गोलंदाजीने ६ विकेट्स घेत इंग्लंडचा डाव गुंडाळला. भारताचा सर्वाेत्कृष्ट वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी घेत आकाशदीपसह चांगली कामगिरी केली. मोहम्मद सिराजने इंग्लंडविरूद्ध सहा विकेट्स घेतल्यानंतर मोठं वक्तव्य केलं आहे.
शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सहा विकेट्स घेण्याची कामगिरी ‘अविश्वसनीय’ असल्याचे म्हटलं. सिराजच्या शानदार गोलंदाजीमुळे सामन्यावरील भारताची पकड अधिक मजबूत झाली आहे. जेमी स्मिथ (२०७ चेंडूत नाबाद १८४ धावा) आणि हॅरी ब्रूक (२३४ चेंडूत १५८ धावा) यांच्या शतकांमुळे इंग्लंडने सामन्यात पुनरागमन करत होता, परंतु सिराजने ७० धावांत सहा विकेट घेतल्याने भारत मजबूत स्थितीत आला.
तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या षटकात सिराजने सलग दोन विकेट घेत चांगली सुरूवात केली. सिराजच्या दोन विकेटमुळे इंग्लंडचा निम्मा संघ केवळ ८४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. पण त्यानंतर ब्रूक आणि स्मिथने ३६८ चेंडूत ३०३ धावांची भागीदारी करून यजमान संघासाठी शानदार पुनरागमन केले. आकाशदीपने ब्रूकची विकेट घेत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला.
मोहम्मद सिराज तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर म्हणाला, “इंग्लंडविरूद्ध ६ विकेट्स घेणं अविश्वसनीय आहे, कारण मी खूप दिवसांपासून अशा कामगिरीची वाट पाहत होतो. मी सातत्याने चांगली गोलंदाजी करत होतो, पण विकेट मिळत नव्हत्या. मी इंग्लंडमध्ये आजवर ४ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे ६ विकेट्स घेणं खूपचं खास आहे.”
आकाशदीपच्या मदतीसह सिराजने खालच्या फळीला झटपट बाद केलं. सिराजने ४ इंग्लंडच्या फलंदाजांना खातंही उघडू दिलं नाही आणि शून्यावर बाद केलं. सिराज पुढे म्हणाला, खेळपट्टी खूपच संथ होती, पण जेव्हा तुम्हाला गोलंदाजी आक्रमणाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली जाते तेव्हा माझं लक्ष फक्त योग्य दिशेने गोलंदाजी करण्यावर असत. माझी मानसिकता भेदक गोलंदाजी करत धावा न देण्याची होती.
बुमराहला दुसऱ्या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आल्याने सिराज एका अनुभवहीन वेगवान गोलंदाजी पथकाचे नेतृत्व करत आहे. त्याच्यासह आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा सारखे वेगवान गोलंदाज संघात आहेत. तो म्हणाला- “आकाश दीपचा हा तिसरा की चौथा सामना आहे, प्रसिद्धही तिसरा,चौथा सामना खेळत आहे. म्हणून मी फलंदाजांवर दबाव आणण्यावर लक्ष केंद्रित करत होतो. मला वेगवेगळ्या गोष्टी करून पहायच्या आहेत, पण मला गोलंदाजीतही सातत्य राखावे लागेल.” बुमराहच्या अनुपस्थितीत गोलंदाजी करताना त्याच्या रेकॉर्डबद्दल विचारले असता, सिराज म्हणाला- “मला जबाबदारी घ्यायला आवडते, आव्हान घेत गोलंदाजी करणं मला आवडतं.”