Mohsin Naqvi Locks Asia Cup Trophy in ACC Office: सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत जेतेपद आपल्या नावे केलं. पण जेतेपद पटकावूनही भारतीय संघाला अद्याप स्पर्धेची ट्रॉफी देण्यात आलेली नाही. आशियाई क्रिकेट परिषद आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी सामन्यानंतर ट्रॉफी घेऊन पळून गेले आणि आता त्यांनी खरोखरच एक धक्कादायक गोष्ट केली आहे. मोहसिन नक्वींनी आशिया कप ट्रॉफी कैद केली आहे.
भारतीय संघाने संपूर्ण आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरूद्ध तीन सामने खेळले. गट टप्प्यातील सामना, सुपर फोर टप्पा आणि नंतर अंतिम सामना; या तिन्ही सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला, पण सामन्यादरम्यान किंवा सामन्यानंतर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूशी हस्तांदोलन केलं नाही किंवा त्यांच्याशी चर्चा केली नाही. यानंतर भारतीय संघाने जेतेपद पटकावल्यानंतर मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला.
मोहसीन नक्वी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत, याशिवाय ते पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत आणि पाकिस्तानचे गृहमंत्रीदेखील आहेत. त्यामुळे संघाने त्यांच्याकडून ट्रॉफी न स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तर नक्वींनी देखील भारतीय संघाला इतर कोणाच्याही हस्ते ट्रॉफी देण्यापेक्षा ते ट्रॉफी घेऊन पळून गेले. आता ही ट्रॉफी नक्वी यांनी एसीसीच्या ऑफिसमध्ये बंद करून ठेवत कोणीही याला हात लावू नये अशी सक्त ताकिद दिली.
भारताने जिंकलेली आशिया चषक ट्रॉफी दुबईच्या कार्यालयात बंद
रिपोर्ट्सनुसार, आशिया चषक ट्रॉफी दुबईतील एसीसीच्या मुख्यालयात बंद करून ठेवण्यात आली आहे. मोहसिन नक्वी यांनी असेही निर्देश दिले आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय ट्रॉफी काढू नये किंवा भारतालाही देऊ नये. भारताने त्यांच्या हस्ते ट्रॉफी घेण्यास नकार दिल्यानंतर ते ट्रॉफी स्वत: बरोबर घेऊन गेले आणि तेव्हापासून ही ट्रॉफी एसीसी कार्यालयात आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे आणि हा तणाव आशिया चषकादरम्यान स्पष्टपणे दिसून आला. नक्वी यांच्या एका जवळच्या सहकाऱ्याने सांगितले आहे की, आशिया चषक ट्रॉफी फक्त तेच भारतीय संघाला किंवा बीसीसीआयला सोपवतील. दुसरे कोणीही भारताला ट्रॉफी देऊ शकत नाही. नक्वी यांच्या कृतीमुळे बीसीसीआय फार नाराज आहे आणि त्यांनी आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. नक्वी यांना लवकरच आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदावरून काढून टाकले जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.