Mohsin Naqvi Treated The Indian Cricket Team Like Terrorists: पाकिस्तानमधील एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांना आशिया कप २०२५ ची ट्रॉफी पळवून नेल्याबद्दल “हिरो” म्हणून गौरवले जात आहे.

या व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील सिंध प्रांताचे राज्यपाल कामरान टेसोरी यांनी पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांचे “टीम इंडियाला धडा शिकवल्याबद्दल” कौतुक केले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष नक्वी हे पाकिस्तानचे गृहमंत्री देखील आहेत.

“जेव्हा ते (मोहसीन नक्वी) स्टेजवर होते आणि भारतीय संघ ट्रॉफी घेत नव्हता, तेव्हा त्यांनीही संयम दाखवला आणि खूप वेळ स्टेजवर उभे राहिले. कारण भारतीय संघाला वाटत होते की, ते स्टेजवरून गेले तर दुसऱ्या कोणाच्या तरी हातून ती स्वीकारता येईल. पण त्यांना (भारतीय संघाला) हे माहित नव्हते की, आपले अध्यक्ष देखील वजीर-ए-दाखिला आहेत”, असे टेसोरी म्हणाले.

या व्हिडिओमध्ये ते पुढे म्हणाले की, “मोहसीन नक्वी यांनी भारतीय संघाला दहशतवाद्यांसारखे हाताळले. त्यांनी ट्रॉफी गाडीत ठेवून सोबत आणली. आता संपूर्ण भारत त्या ट्रॉफीच्या मागे धावत आहे.”

कामरान टेसोरी हे बोलत असताना मोहसीन नक्वीही तिथे उपस्थित होते. ते हसत हसत टेसोरी यांना दाद देत होते. इंस्टाग्रामवर या व्हिडिओला ५० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी यावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका चाहत्याने प्रश्न उपस्थित केला की, “त्यांनी ट्रॉफी चोरीबद्दल उघडपणे कबुली दिली आहे का?”

“तुमच्या ट्रॉफीच्या मागे कोणीही नाही. भारत आशिया कप चॅम्पियन आहे. भारताने ही स्पर्धा प्रामाणिकपणे जिंकली आहे”, अशी कमेंट दुसऱ्या एका युजरने केली.

काय आहे वाद?

यूएईमध्ये झालेल्या यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे भारताने जेतेपद पटकावले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे भारताने पाकिस्तानचे गृहमंत्री आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून स्पर्धेची ट्रॉफी न स्वीकारण्याची भूमिका घेतली होती. तर दुसरीकडे, नक्वीही भारतीय संघाला त्यांच्या हस्तेच ट्रॉफी देण्यावर ठाम होते. भारतीय संघाने आपली भूमिका कायम ठेवल्यानंतर नक्वी आशिया चषकाची ट्रॉफी सोबत घेऊन गेले होते. स्पर्धेला एक महिना उलटून गेला तरीही भारतीय संघाला विजेतेपदाची ट्रॉफी अद्याप मिळालेली नाही.