केंद्र सरकारने अखेर मोटार स्पोर्ट्सला क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला आहे. भारतीय मोटार स्पोर्ट्स महासंघ (एफएमएससीआय) या देशातील शिखर संघटनेचा क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा महासंघांच्या (एनएसएफ) समावेश केला आहे.
कर आणि अन्य अडथळ्यांमुळे फॉम्र्युला-वनसारखी प्रतिष्ठेची स्पर्धा भारतापासून दुरावल्यामुळे केंद्रीय क्रीडा खात्याला जाग आल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. ही स्पर्धा पुन्हा भारतात व्हावी, याच हेतूने ही पावले उचलली जात आहेत.
क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या यादीमध्ये ‘अन्य’ क्रीडा प्रकारांमध्ये मोटार स्पोर्ट्सचा समावेश केला आहे. याचा अर्थ एफएमएससीआयला कोणतेही आर्थिक पाठबळ सरकारकडून मिळणार नाही. परंतु केंद्र सरकारच्या या धोरणाचा फॉम्र्युला-वन शर्यत पुन्हा भारतात आणण्यासाठी कोणतीही मदत होणार नाही.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोटार स्पोर्ट्सला क्रीडा प्रकार म्हणून मान्यता मिळाल्यामुळे एफएमएससीआयचे माजी अध्यक्ष विकी चांडोक अत्यंत आनंदात होते. ‘‘२०११मध्ये राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या यादीतून मोटार स्पोर्ट्सला वगळण्यात आले होते, परंतु आता आता पुन्हा समावेश करण्यात आला आहे. भारतीय मोटार स्पोर्ट्स क्षेत्रासाठी ही आनंददायी गोष्ट आहे,’’ असे चांडोक यांनी सांगितले. ‘‘क्रीडा मंत्रालयाच्या मान्यतेमुळे चांगले दिवस येतील,’’ अशी आशा माजी शर्यतपटू अकबर इब्राहिम यांनी व्यक्त केली.