भारतीय क्रिकेट संघ विंडीज दौऱ्यावर आहे. उद्यापासून भारताची विंडीजविरुद्ध टी २० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत पहिले २ सामने अमेरिकेत होणार असून तिसरा सामना विंडीजला होणार आहे. या दौऱ्यावर ऋषभ पंत याच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. महेंद्रसिंग धोनीने या दौऱ्यातून माघार घेतल्यामुळे ऋषभ पंतला संघात स्थान देण्यात आले आहे. धोनी दोन महिन्यांसाठी भारतीय लष्करासोबत आहे. ३१ जुलैपासून त्याने काश्मीरमधील त्याला नेमून दिलेल्या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे आता धोनी लष्कराच्या गणवेशात दिसणार असून त्याचा एक खास फोटो व्हायरल झाला आहे.
धोनी सध्या भारतीय लष्कराच्या कॅम्पमध्ये आहे. भारतीय सैन्यात सेवा देता यावी आणि भारतीयांची सेवा करता यावी, यासाठी धोनीने टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतली. पण तरीदेखील त्याच्या हातून बॅट सुटलेली नाही. व्हायरल झालेल्या फोटोत धोनी लष्करी जवानाच्या गणवेशात आहे. त्याच्यासोबत असलेल्या बटालियनमधील इतर जवान धोनीसोबत आनंद व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच त्या जवानांना धोनी बॅटवर स्वाक्षरी देत आहे आणि त्यांच्यासोबत फोटोही काढत आहे असे फोटोतून दिसत आहे.
Here comes the 1st exclusive picture of #LtColonelDHONI From Srinager. pic.twitter.com/gbZtqyQETJ
— DHONIsm (@DHONIism) August 1, 2019
धोनी ज्या बटालियनमध्ये आहे, ती बटालियन विशेष सैनिकांची आहे. यात देशातील विविध विभागातून आलेले जवान आहेत. धोनीला येथे दिवस आणि रात्र अशा शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. या वेळी धोनीकडे ५ किलो वजनाच्या ३ मॅगझीन, ३ किलोग्रॅम वजनाचा पोशाख, २ किलो वजनाचे बूट, ४ किलोचे ३ ते ६ ग्रेनेड, १ किलोचे हेल्मेट आणि ४ किलोचे बुलेटप्रुफ जॅकेट असे एकूण १९ किलो वजन असणार आहे. “धोनी आता १०६ टेरिटॉरियर आर्मी बटालियनचा सदस्य (पॅरा) आहे. त्यामुळे तो आता अनेकांचे रक्षण करू शकतो. ही बटालियन अत्यंत दमदार कामगिरी करणारी बटालियन आहे आणि तो हाच बटालियनचा भाग आहे, त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची गरज लागणार नाही”, असा विश्वास लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी धोनीबाबत बोलताना व्यक्त केला आहे.