भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांनी आज लग्नाची ११ वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वांनी धोनी आणि साक्षीला यासाठी शुभेच्छा दिल्या. धोनी सोशल मीडियावर कमी अॅक्टिव्ह असतो, पण साक्षी खूप अॅक्टिव्ह राहते आणि ती पतीशी संबंधित फोटो चाहत्यांसह शेअर करते. दरम्यान, धोनीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोणती भेट दिली आहे, हे साक्षीने सांगितले आहे.
साक्षीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्टसह अनेक फोटो पोस्ट केले. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने साक्षीला व्हिंटेज कार फॉक्सवॅगन बीटल गिफ्ट केली आहे.

हेही वाचा – ‘‘धोनीसाठी कोणताही खेळाडू बंदुकीची गोळी खाण्यास तयार”
साक्षीनेही या गिफ्टबद्दल धोनीचे आभार मानले आहेत. धोनी आणि साक्षीने ४ जुलै २०१० रोजी लग्नगाठ बांधली. त्यांनी एक दिवस आधी म्हणजेच 3 जुलै रोजी डेहराडूनमध्ये साखरपुडा केला. लग्नाआधी दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले होते.
यंदा वर्षाअखेर आयपीएलसाठी धोनी मैदानावर परतणार आहे, या लीगचा दुसरा टप्पा यूएईमध्ये होणार आहे. आयपीएल १४व्या हंगामात धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. करोनामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. मात्र आता उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन यूएईत १९ सप्टेंबरपासून होणार आहे.