भारताचा ‘कॅप्टन कूल’ आणि माजी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द एका वर्षापूर्वी संपली असली, तरी त्याची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. काहीजण आयपीएल फक्त धोनीच्या वावरासाठी पाहतात. अनेकांनी त्याचे फॅनपेजेस तयार केले आहेत. जगभरात धोनीचे असंख्य चाहते आहेत आणि भारतात तर त्याला एखाद्या देवासारखे पूजले जाते. धोनीसुद्धा आपल्या चाहत्यांनाही चांगली वागणूक देतो. आता पुन्हा एकदा धोनीचे ‘चाहताप्रेम’ समोर आले आहे. धोनीने तब्बल १३ वर्षांनंतर एका चाहत्याची इच्छा पूर्ण केली.

धोनी नुकताच कुटूंबासह हिमाचल प्रदेशला गेला होता. तेथे तो मीनाबाग हॉटेलमध्ये थांबला. इथला एक कर्मचारी ‘कॅप्टन कूल’चा जुना चाहता असल्याचे समोर आले. मीनाबाग हॉटेलच्या सर्व कर्मचार्‍यांसाठी एमएस धोनीची भेट हा एक अविस्मरणीय क्षण होता, परंतु देव नावाच्या माणसासाठी हे स्वप्नासारखे होते. १३ वर्षांपूर्वी देव यांनी शिमलाहून रत्नारी येथे त्यांची बदली करून घेतली, जेणेकरुन ते धोनीचे आदरातिथ्य करू शकतील.

 

हेही वाचा – फुटबॉलपटूनं मैदानातच केलं प्रेयसीला प्रपोज..! व्हिडिओ झाला व्हायरल

धोनी २००८साली हिमाचल प्रदेशच्या रोहरू भागात एक स्पर्धा खेळण्यासाठी आला होता, त्यावेळी देव तिथे उपस्थित होते, पण त्यावेळी त्यांना धोनीची भेट घेता आली नाही.

१३ वर्षाच्या तपानंतर ‘देव’ला धोनी सापडला…

अखेरीस, १३ वर्षाच्या तपानंतर, देवचे स्वप्न पूर्ण झाले. तो धोनीलाच भेटला. इतकेच नव्हे, तर धोनीने त्यांना मोबाइल कव्हरवर ऑटोग्राफही दिला. या ऑटोग्राफचा फोटो मीनाबाग हॉटेलने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.