MS Dhoni on His Future with CSK : माजी भारतीय क्रिकेटपटू व चेन्नई सुपरकिंग्स (सीएसके) संघातील अनुभवी खेळाडू महेंद्रसिंह धोनी यंदा इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा चालू आहेत. दरम्यान, धोनीने यावर एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. धोनीने स्पष्ट केलं आहे की सीएसकेबरोबरचे त्याचे संबंध खूप घनिष्ट आहेत आणि ते यापुढेही कायम राहतील. धोनी आयपीएलच्या पुढच्या हंगामात खेळणार की नाही यावर धोनीने स्पष्ट प्रतिक्रिया दिलेली नसली तरी तो या फ्रेंचायझीबरोबर कायम असेल असं त्याने म्हटलं आहे. धोनी म्हणाला, त्याच्या कारकिर्दीत पुढे कोणत्याही गोष्टी घडल्या तरी तो नेहमीच सीएसकेबरोबर असेल.

धोनीशिवाय सीएसके अशी प्रतिमा देखील डोळ्यांसमोर उभी राहत नाही, असं सीएसके व धोनीचे चाहते नेहमीच म्हणत असतात. धोनीलाही चाहत्यांच्या या प्रेमाची कल्पना आहे. दरम्यान, ४४ वर्षीय धोनीने स्पष्ट केलं आहे की सक्रीय खेळाडू असताना आणि त्यानंतरही तो सीएसकेबरोबर असेल. काही दिवसांपूर्वी धोनीने चेन्नईत आयोजित एका खासगी कार्यक्रमात ही टिप्पणी केली होती, जी आता समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

धोनी नेमकं काय म्हणाला?

धोनी म्हणाला, “मी नेहमीच सांगत आलोय की माझ्याकडे निर्णय घेण्यासाठी खूप वेळ आहे. परंतु, तुम्ही जर पिवळ्या जर्सीमध्ये पुनरागमन करण्याबाबत विचारत असाल तर मी त्याबद्दल एवढंच सांगेन की मी नेहमीच पिवळ्या जर्सीमध्ये असेन. मी खेळत असेन किंवा नसेन ती वेगळी गोष्ट आहे. परंतु, मी आणि सीएसके एकत्र आहोत. पुढची १५-२० वर्षे आम्ही एकत्रच असू.”

चेन्नई सुपरकिंग्सची पिछेहाट

धोनी २००८ पासून म्हणजेच आयपीएलच्या सुरुवातीपासून सीएसकेच्या संघाचा भाग आहे. धोनीने आता चेन्नई सुपरकिंग्स संघाचं कर्णधारपद सोडलं आहे. मात्र, आयपीएल २०२५ मध्ये नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्यामुळे त्याला स्पर्धा अर्ध्यातूनच सोडून जावं लागलं. त्यानंतर उर्वरित सामन्यांमध्ये धोनीने संघाचं नेतृत्व केलं. परंतु, पाच वेळा चेन्नईला आयपीएलचं विजेतेपद मिळवून देणारा धोनी यंदा संघासाठी कुठल्यही आघाडीवर उत्तम कामगिरी करू शकला नाही. हा संघ गुणतालिकेच्या तळाशी राहिला. चेन्नईचा संघ हंगामातील एकूण १४ सामन्यांपैकी केवळ चारच सामने जिंकू शकला.