नितीशच्या अर्धशतकाने मुंबईचा विजय; गुजरातवर सहा विकेट्स राखून मात
तो आला, त्याने धावा केल्या आणि मुंबईच्या विजयात मोलाची भूमिका वठवली, असे नितीश राणाबाबत यंदाच्या आयपीएल हंगामात बऱ्याचदा घडले आहे. वानखेडेवर रविवारी रंगलेल्या गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यातही राणाने आपल्या जोरकस फटक्यांनी हंगामातील दुसरे अर्धशतक झळकावत मुंबईकरांची मने जिंकली आणि मुंबई इंडियन्सच्या विजयात अमूल्य योगदान दिले. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना १७६ धावा केल्या होत्या. राणाच्या अर्धशतकाने मुंबईचा विजय सुकर केला आणि त्यानंतर किरॉन पोलार्ड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या खेळीने मुंबईला गुजरातवर सहा विकेट्स राखून हंगामातील सलग चौथा विजय नोंदवता आला.
तत्पूर्वी, मुंबईने नाणेफेक जिंकून गुजरातला फलंदाजीसाठी पाचारण केले. मिचेल मॅक्क्लेघनने पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ड्वेन स्मिथला भोपळाही फोडू न देता माघारी धाडत गुजरातला पहिला धक्का दिला; पण या धक्क्यातून मॅक्क्युलम आणि कर्णधार सुरेश रैना (२८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी रचत बाहेर काढले. रैना सावधपणे फलंदाजी करत असला तरी मॅक्क्युलमने आपल्या जोरदार फटक्यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या सहाव्या षटकात दोन षटकार लगावत मॅक्क्युलमने आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर धावांचा रतीब घालत त्याने धावसंख्येला चांगला आकार दिला. कुणाल पंडय़ाच्या ११ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर लाँग ऑनला एकेरी धाव घेत मॅक्क्युलमने अर्धशतक पूर्ण केले; पण त्यानंतरच्याच १२व्या षटकात गुजरातला रैनाच्या रूपात दुसरा धक्का बसला. हरभजन सिंगच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने कव्हर्समध्ये अप्रतिम झेल टिपत रैनाला माघारी धाडले. रैनानंतर मॅक्क्युलमही जास्त धावा करू शकला नाही. मलिंगाच्या १४व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मॅक्क्युलमने चौकार लगावला; पण त्यानंतरच्याच चेंडूवर मलिंगाने भेदक मारा करत अप्रतिमपणे त्याच्या त्रिफळ्याचा वेध घेतला. मॅक्क्युलमने ४४ चेंडूंत ६ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६४ धावा केल्या. स्थिरस्थावर झालेला मॅक्क्युलम बाद झाल्यावर गुजरातच्या धावा आटतील असे वाटले होते; पण दिनेश कार्तिकने दमदार फलंदाजी करत धावगती जलदगतीने वाढवली. त्याच्या या धडाकेबाज खेळीमुळेच गुजरातला १७६ धावांपर्यंत मजल मारता आली. कार्तिकने २६ चेंडूंत प्रत्येकी दोन षटकार आणि चौकार लगावत नाबाद ४८ धावांची सुरेख खेळी साकारली. मुंबईकडून मिचेल मॅक्लेघनने दोन बळी मिळवले, तर मलिंगाला एक फलंदाज बाद करण्यासाठी तब्बल ५१ धावा मोजाव्या लागल्या.
गुजरातच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर प्रवीण कुमारने पार्थिव पटेलला (०) तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर १० धावांवर असताना मुंबईकडून सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या राणाला बासिल थम्पीच्या गोलंदाजीवर जेसन रॉयने जीवदान दिले. राणाचा प्रवीण कुमारने एवढा धसका घेतला होता की, त्याने तिसऱ्या षटकात राणा समोर असताना तब्बल चार चेंडू वाइड टाकले. जीवदानाचा पुरेपूर फायदा राणाने घेतला. पाचव्या षटकात थम्पीच्या गोलंदाजीवर सुरेख षटकार लगावत राणाने आपले इरादे स्पष्ट केले. ‘पॉवर प्ले’च्या पहिल्या सहा षटकांमध्ये मुंबईच्या ५६ धावा झाल्या होत्या, यामध्ये राणाचा वाटा ३४ धावांचा होता. रवींद्र जडेजाच्या नवव्या षटकात बॅकवर्ड पॉइंटला चौकार लगावत राणाने ३२ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे हंगामातले दुसरे अर्धशतक ठरले. यापूर्वी वानखेडेवरच राणाने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध पहिले अर्धशतक झळकावले होते. अर्धशतकानंतर राणाला फक्त तीन धावांचीच भर घालता आली. अॅण्ड्रय़ू टायने राणाला बाद करत गुजरातला यश मिळवून दिले. राणाने ३६ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी साकारली. राणा बाद झाल्यावर रोहित (नाबाद ४०) आणि किरॉन पोलार्ड (३९) यांनी कलात्मक फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.
संक्षिप्त धावफलक
गुजरात लायन्स : २० षटकांत ४ बाद १७६ (ब्रेंडन मॅक्क्युलम ६४, दिनेश कार्तिक नाबाद ४८; मिचेल मॅक्लेघन २/२४) विजयी वि. मुंबई इंडियन्स : १९.३ षटकांत ४ बाद १७७ (नितीश राणा ५३, रोहित शर्मा नाबाद ४०, किरॉन पोलार्ड ३९; अॅण्ड्रय़ू टाय २/३४).
..म्हणून फिंच खेळू शकला नाही!
गुजरात लायन्सचा शुक्रवारी सामना रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाशी राजकोटमध्ये होता. तो सामना झाल्यावर आरोन फिंच आपले क्रीडा साहित्य मुंबईला येताना विसरला. नाणेफेकीप्रसंगी फिंच खेळणार नसल्याचे गुजरातचा कर्णधार सुरेश रैनाने सांगितले, तेव्हा साऱ्यांनाच धक्का बसला.‘‘राजकोट येथील सामन्यानंतर मुंबईला येताना फिंच आपले क्रीडा साहित्य विसरला. त्यामुळे त्याला मुंबईमध्ये सरावही करता आला नाही. त्यामुळेच मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यासाठी त्याला वगळून जेसन रॉयला संघात स्थान देण्यात आले आहे,’’ असे रैनाने सांगितले.