आज वानखेडेवर मुंबई इंडियन्सशी सामना
कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध विजयानंतर तूर्तास किंग्ज इलेव्हन पंजाबला दिलासा मिळाला आहे. परंतु उर्वरित दोन्ही सामने जिंकले, तरच ‘बुडता पंजाब’चे बाद फेरीचे स्वप्न टिकू शकते. त्यामुळे गुरुवारी गुणतालिकेत अव्वल स्थानावरील मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव पत्करल्यास पंजाबचे दोर कापले जाऊ शकतात आणि बाद फेरीतील अंतिम चार संघ सहज निश्चित होतील. त्यामुळेच उत्तरोत्तर रंगत निर्माण करणाऱ्या आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या दहाव्या हंगामातील या सामन्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
मुंबई इंडियन्सने १२ सामन्यांतून १८ गुण कमावत गुणतालिकेतील अग्रस्थानासह ‘प्ले-ऑफ’चे स्थान निश्चित केले आहे. ते टिकवीत वानखेडे स्टेडियमवरच प्रथम पात्रतेचा (क्वालिफायर-१) सामना खेळणे, हे त्यांचे प्रमुख लक्ष्य आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खात्यावर १२ सामन्यांतून १२ गुण जमा आहेत. त्यामुळे पंजाब हरल्यास मुंबईसह कोलकाता (१३ सामन्यांत १६ गुण), रायझिंग पुणे सुपर जायंट्स (१२ सामन्यांत १६ गुण) आणि सनरायझर्स हैदराबाद (१३ सामन्यांत १५ गुण) या चारही संघांचे स्थान निश्चित होऊ शकेल. कारण येत्या रविवारी होणारी अखेरची लढत जिंकली तरी पंजाबच्या खात्यावर १४ गुण जमा होऊ शकतील.
मुंबई इंडियन्सचा अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभव झाला होता. त्यामुळे वानखेडे स्टेडियमच्या बालेकिल्ल्यावर अर्थातच मुंबईचे पारडे जड आहे. यंदाच्या हंगामात मुंबईने घरच्या मैदानावरील एकमेव पराभव पुण्याविरुद्ध पत्करला होता.
कर्णधार रोहित शर्मा, नितीश राणा, पार्थिव पटेल, किरॉन पोलार्ड आणि लेंडल सिमन्स या फलंदाजांनी संपूर्ण हंगामात दमदार फटकेबाजीसह प्रतिस्पर्धी संघांच्या सर्वोत्तम गोलंदाजांवर प्रभुत्व मिळवले आहे. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेच्या निमित्ताने भारतीय संघात पुनरागमन करणाऱ्या रोहितने मागील सामन्यात ४५ चेंडूंत ६७ धावांची खेळी साकारली होती. त्यामुळे फलंदाजीला अनुकूल वानखेडेच्या खेळपट्टीवर गुरुवारी पुन्हा त्याच्या फलंदाजीचा आविष्कार पाहता येऊ शकेल.
पार्थिव आणि सिमन्स मुंबईला दमदार सलामी देण्यासाठी उत्सुक आहेत. याशिवाय मुंबईच्या विजयात नेहमी योगदान असणाऱ्या हार्दिक आणि कृणाल या पंडय़ा बंधूंवर संघाची मदार आहे. ऑफ-स्पिनर हरभजन सिंग हे मुंबईच्या संघाचे आणखी एक वैशिष्टय़. प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवण्याचे कसब त्याला चांगले जमते. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्क्लिनॅघनच्या खात्यावर आतापर्यंत १७ बळी जमा आहेत. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा, शेवटच्या षटकांमध्ये टिच्चून गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह, हरभजन, पंडय़ा बंधू यांच्यामुळे मुंबईची गोलंदाजी अधिक समृद्ध झाली आहे. मलिंगाला आयपीएलच्या अखेरच्या टप्प्यात लय सापडली असल्याने त्याच्यावर विश्वास टाकला जाईल, अशी अपेक्षा आहे.
पंजाबच्या संघाने मंगळवारी रात्री कोलकाताला हरवण्याची किमया साधली आहे. पंजाबच्या फलंदाजीची प्रमुख धुरा असलेला हशिम अमला व डेव्हिड मिलर परतल्यामुळे त्यांची बाजू कमकुवत झाली आहे. कर्णधार ग्लेन मॅक्सवेल, मार्टिन गप्तिल आणि शॉन मार्श यांच्यावर त्यांच्या फलंदाजीची मदार आहे.
वेगवान गोलंदाज संदीप शर्मा आणि मोहित शर्मा यांच्या माऱ्याचे आव्हान मुंबईसमोर असेल. या दोघांच्या गोलंदाजीचे पंजाबच्या विजयांमध्ये महत्त्वाचे योगदान आहे. फिरकी गोलंदाज अक्षर पटेलसुद्धा वानखेडेवर फिरकीची करामत दाखवू शकतो.