राजकोट येथे झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात अवघ्या तीन दिवसांमध्येच पाहुण्या वेस्ट इंडिजला धूळ चारल्यानंतर आजपासून दुसऱ्या कसोटीला सुरूवात झाली आहे. नाणेफेक जिंकून विंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात मुंबईकर शार्दूल ठाकूरला अंतिम संघात स्थान मिळाले आहे. तो २९४वा भारतीय कसोटीपटू ठरला आहे. मोहम्मद शमीला या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. पहिल्या सामन्यात शार्दूल ठाकूरला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळू शकली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळाले आहे.
Proud moment for @imShard as he receives his Test cap from @RaviShastriOfc, becomes the 294th player to represent #TeamIndia in Tests.#INDvWI pic.twitter.com/2XcClLka9a
— BCCI (@BCCI) October 12, 2018
पहिल्या सामन्यातही शार्दूल ठाकूर १२ जणांच्या संघात स्थान देण्यात आले होते. मात्र त्याला वगळून उमेश यादव आणि मोहम्मद शमी या जोडीला अंतिम ११मध्ये समाविष्ट केले गेले होते. पण या दोघांना म्हणावा तसा आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवता आला नाही. दोनही डावात मिळून उमेश यादवने १४ षटके फेकली. त्यात त्याला केवळ १ बळी टिपता आला. तर मोहम्मद शमीने एकूण १२ षटके फेकून २ बळी टिपले. त्यामुळे दुसऱ्या कसोटी संघात शार्दूल ठाकूरला संधी मिळाली आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे मालिकेत भारत १-०ने आघाडीवर आहे. हा सामना केवळ तीन दिवसांत संपला. त्यातही सुमारे दीड दिवस भारताने एक डाव फलंदाजी केली. उर्वरित कालावधीत विंडीजच्या संघाचे दोन डाव संपुष्टात आले होते. भारताने पहिला डाव ६४९ धावा करून अखेर घोषित केला, पण विंडीजच्या संघाला दोन्ही डावात मिळूनही तितकी धावसंख्या उभारता आली नव्हती.