कृष्णा, भरत यांनाही संधी; पहिल्या कसोटीत रहाणेकडे नेतृत्व

न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यरसह वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णा आणि यष्टिरक्षक केएस भरत या नव्या चेहऱ्यांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. 

या मालिकेत सर्व प्रकारांत खेळणाऱ्या काही तारांकित खेळाडूंना मात्र विश्रांती दिली आहे. कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीत खेळणार नसल्यामुळे उपकर्णधार अजिक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. कोहली मुंबईत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत मात्र खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) खेळाडूंच्या ताण व्यवस्थापन धोरणानुसार,  सलामीवीर रोहित शर्मा, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज जसप्रित बुमरा आणि मोहम्मद शमी या चौघांना विश्रांती देण्यात आली आहे.

पहिल्या कसोटीत कोहली नसल्यामुळे श्रेयसचे पदार्पण निश्चित मानले जात आहे. ३७ वर्षीय अनुभवी वृद्धिमान साहा पंतच्या अनुपस्थितीत यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळेल. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या फिरकी गोलंदाजांसह इंग्लंडविरुद्ध मालिकेत चमकणारा अक्षर पटेल हा तिसरा पर्याय उपलब्ध आहे.

भारताचा कसोटी संघ :

अजिक्य रहाणे (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), केएस भरत (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा.

विहारीला वगळले

भारतीय संघातून अष्टपैलू हनुमा विहारीला वगळण्यात आले असून तो डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सुरू होणाऱ्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

मुंबईतील भारत-न्यूझीलंड कसोटीसाठी १०० टक्के प्रेक्षकक्षमतेची मागणी

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या भारत-न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी १०० टक्के प्रेक्षकक्षमतेची मागणी मुंबई क्रिकेट संघटनेने (एमसीए) राज्य शासनाकडे केली आहे.‘एमसीए’ त्यांच्या धोरणाच्या प्रतीक्षेत आहे, असे संघटनेच्या सूत्रांनी सांगितले.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वार्षिक सर्वसाधारण सभेला अध्यक्ष विजय पाटील हे ‘एमसीए’चे प्रतिनिधित्व करतील, यावर शुक्रवारी झालेल्या ‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेच्या सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या (एनसीए) प्रशिक्षकपदासाठी मुंबईचा प्रशिक्षक अमोल मुझुमदारने दिलेल्या मुलाखतीबाबत कार्यकारी परिषदेने नाराजी प्रकट केली. ‘एमसीए’ कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतन योजनेचा ठरावही बिनविरोध मंजूर केला.