scorecardresearch

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची पकड मजबूत ; पहिल्या डावात ३८४ धावांच्या प्रत्युत्तरात; मुंबई दिवसअखेर ५ बाद १८७

उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांनी किमान पहिल्या डावात आघाडीची आवश्यकता आहे.

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राची पकड मजबूत ; पहिल्या डावात ३८४ धावांच्या प्रत्युत्तरात; मुंबई दिवसअखेर ५ बाद १८७
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- इंडियन एक्स्प्रेस

मुंबई : मुंबईचा यष्टिरक्षक-फलंदाज प्रसाद पवारच्या (१७० चेंडूंत नाबाद ९९ धावा) झुंजार फलंदाजीनंतरही महाराष्ट्राला रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत ब-गटातील अखेरच्या साखळी सामन्यावर पकड मिळवण्यात यश आले आहे.

मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर सुरू असलेल्या या निर्णायक सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव ३८४ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर पवारचा अपवाद वगळता मुंबईच्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. त्यामुळे मुंबईची दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १८७ अशी स्थिती होती. ते अजून १९७ धावांनी पिछाडीवर होते. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांनी किमान पहिल्या डावात आघाडीची आवश्यकता आहे.

मुंबईच्या डावाची सुरुवातच अडखळती झाली. दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या यशस्वी जैस्वालला डावाच्या पहिल्याच चेंडूवर प्रदीप दाढेने पायचीत पकडले. यानंतर पृथ्वी शॉच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला डावखुरा सलामीवीर दिव्यांश सक्सेना (५० चेंडूंत ३५) आणि केवळ तिसराच प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या प्रसाद पवारने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी दुसऱ्या गडय़ासाठी ७९ धावांची भागीदारी रचल्यावर दिव्यांशला आशय पालकरने माघारी पाठवले. मग कर्णधार अजिंक्य रहाणे (१४), अरमान जाफर (१९) आणि सुवेद पारकर (२०) यांना मोठी खेळी करता आली नाही. एका बाजूने गडी बाद होत असताना दुसऱ्या बाजूने पवारने चिवट फलंदाजी केली. दिवसअखेर तो ९९ धावांवर खेळत होता. त्याने या खेळीत १२ चौकार मारले आहेत. मुंबईला या डावात प्रमुख फलंदाज सर्फराज खानची उणीव जाणवली.

त्यापूर्वी, दुसऱ्या दिवशी ६ बाद ३१४ धावांवरून पुढे खेळणाऱ्या महाराष्ट्राला ७० धावांचीच भर घालता आली. त्यांचा डाव ३८४ धावांवर आटोपला. आशय पालकरने हंगामातील तिसरे अर्धशतक साकारताना १५० चेंडूंत नाबाद ६६ धावांचे योगदान दिले. त्याला सौरभ नवलेने (७४ चेंडूंत ५८) चांगली साथ दिली. मुंबईकडून वेगवान गोलंदाज मोहित अवस्थीने पाच गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

’ महाराष्ट्र (पहिला डाव) : ११५ षटकांत सर्वबाद ३८४ (केदार जाधव १२८, आशय पालकर नाबाद ६६, सौरभ नवले ५८; मोहित अवस्थी ५/८९, शम्स मुलानी ३/११८)

मुंबई (पहिला डाव) : ५६.४ षटकांत ५ बाद १८७ (प्रसाद पवार नाबाद ९९, दिव्यांश सक्सेना ३५; प्रदीप दाढे २/५०, विकी ओस्तवाल १/३७, आशय पालकर १/३९)

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-01-2023 at 02:50 IST

संबंधित बातम्या