मुंबईची जेतेपदाला गवसणी

मुंबईच्या कनिष्ठ संघाने सी. के. नायडू २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

जेतेपदाच्या चषकासह मुंबईचा संघ

रणजी करंडक स्पर्धेच्या ४०व्या जेतेपदावर कब्जा करणाऱ्या वरिष्ठ संघाकडून प्रेरणा घेत मुंबईच्या कनिष्ठ संघाने सी. के. नायडू २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे मुंबईने जेतेपदावर नाव कोरले.
मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ५७७ धावांचा डोंगर उभारला. रणजी संघातून डच्चू मिळालेल्या जय बिस्तने ३० चौकारांसह २१७ धावांची मॅरेथॉन खेळी केली. एकनाथ केरकरने १३ चौकारांसह १०२ धावांची खेळी केली. आकाश पारकरने ७५ तर अरमान जाफरने ६० धावा करत चांगली साथ दिली. मध्य प्रदेशतर्फे वेंकटेशने सर्वाधिक ३ बळी घेतले. या प्रचंड धावसंख्यसमोर खेळताना दडपण न घेता मध्य प्रदेशने ४४२ धावा केल्या. शुभम शर्माने १८ चौकार आणि एका षटकारासह १३१ धावा केल्या. सारांश जैनने ८५ तर रजत पाटीदारने ८२ धावा धावांची खेळी केली. मुंबईतर्फे तुषार देशपांडेने ५ तर आकाश पारकरने ४ बळी घेतले. मुंबईला १३५ धावांची आघाडी मिळाली. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक
मुंबई : १८८.५ षटकांत सर्वबाद ५७७ (जय बिस्त २१७, एकनाथ केरकर १०२; वेंकटेश अय्यर ३/११८) विजयी विरुद्ध मध्य प्रदेश : १७१.५ षटकांत सर्वबाद ४४२ (शुभम शर्मा १३१, सारांश जैन ८५; तुषार देशपांडे ५/१४३, आकाश पारकर ४/७७).

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai win ck nayudu trophy