या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस, आदित्य, सिद्धेश यांची अर्धशतके; दिवसअखेर ७ बाद ३२७

श्रेयस अय्यरच्या धडाकेबाज ९० धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीत मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या दिवशी वर्चस्व गाजवले. श्रेयसने सलामीवीर भावीन ठक्करसह ८८ धावांची भागीदारी करून रचलेल्या पायावर आदित्य तरे, सिद्धेश लाड आणि अभिषेक नायर यांनी धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या दिवसअखेर मुंबईने ७ बाद ३२७ धावा केल्या. मध्य प्रदेशच्या चंद्रकांत साकुरेने ४ बळी टिपून मुंबईच्या धावगतीला वेसण घालण्याचा प्रयत्न केला.

नाणेफेक जिंकून मध्य प्रदेशने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या अखिल हेरवाडकरला ११व्या षटकांत साकुरेने बाद करून मुंबईला पहिला धक्का दिला. १ बाद २४ अशा निराशाजनक सुरुवातीनंतर ठक्कर आणि अय्यर या जोडीने मुंबईला सावरले. दोघांनी संयमी खेळ करत ८८ धावांची भागीदारी रचली. ठक्करला बाद करून साकुरेने ही जोडी तोडली. त्यानंतर आलेल्या सूर्यकुमार यादवला भोपळाही फोडू न देता ईश्वर पांडेने माघारी धाडले.

दोन फलंदाज झटपट बाद झाल्यानंतरही अय्यरने चौथ्या विकेटसाठी कर्णधार आदित्य तरेसह ५७ धावांची भागीदारी केली. शतकाच्या उंबरठय़ावर आलेल्या अय्यरला साकुरेने बाद केले. अय्यरने १०४ चेंडूंत १३ चौकार व एक षटकार खेचून ९० धावा केल्या. त्यानंतर तरे व लाड आणि लाड व अभिषेक नायर यांनी अनुक्रमे ६५ व ७५ धावांची भागीदारी करून मुंबईला त्रिशतकी मजल मारून दिली. लाडने एका बाजूने चिवट खेळ करताना दिवसअखेपर्यंत खेळपट्टीवर ठाण मांडले. त्याने १११ चेंडूंत ११ चौकारांसह नाबाद ५७ धावा केल्या आहेत. शार्दूल ठाकूर ८ धावांवर खेळत आहे.

इश्वर पांडे या अनुभवी गोलंदाजाच्या तुलनेत मुंबईच्या फलंदाजांनी साकुरेच्या गोलंदाजासमोर विकेट गमावल्या.

धावफलक

  • मुंबई : अखिल हेरवाडकर झे. ओझा गो. साकुरे १६, भावीन ठक्कर झे. हरप्रीत सिंग गो. साकुरे ३०, श्रेयस अय्यर झे. बुंदेला गो. साकुरे ९०, सूर्यकुमार यादव झे. पटीदर गो. पांडे ०, आदित्य तरे पायचीत गो. बवेजा ६८, सिद्धेश लाड खेळत आहे ५७, अभिषेक नायर झे. व गो. पांडे ४३, इक्बाल अब्दुल्ला झे. बुंदेला गो. साकुरे २, शार्दूल ठाकूर खेळत आहे ८. अवांतर : १३; एकूण – ८९ षटकांत ७ बाद ३२७
  • गोलंदाज : ईश्वर पांडे १९-६-३४-२, पुनीत दाते २१-४-९१-०, चंद्रकांत साकुरे २५-३-१०२-४, हरप्रीत सिंग १६-२-५३-०, जयदीप बवेजा ६-०-२६-१, जलाज सक्सेना २-०-१०-०.

आसामचा डाव गडगडला

जयदेव उनाडकत आणि हार्दिक राठोड यांच्या भेदक गोलंदाजीसमोर आसामने रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्य फेरीत सौराष्ट्रसमोर शरणागती पत्करली. उनाडकत आणि राठोड यांनी प्रत्येकी तीन बळी टिपल्याने दिवसअखेर आसामची ७ बाद १९३ अशी दयनीय अवस्था झाली होती. अमित वर्मा आणि अरुण कार्तिक यांनी अर्धशतकी खेळी करून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.

आसामने स्पर्धेत आतापर्यंत बलाढय़ संघांना चीतपट करत उपांत्य फेरी गाठली आहे. गोलंदाजी हा त्याचा बालेकिल्ला आहे. मात्र सौराष्ट्रच्या अनुभवी गोलंदाजीसमोर आसामचे फलंदाज निष्प्रभ ठरले. आयपीएल स्पर्धेत फ्रँचाइजींचे लक्ष्य ठरलेले जयदेव उनाडकतने आपली उपयुक्तता सिद्ध केली.

संक्षिप्त धावफलक

आसाम (पहिला डाव): ७८ षटकांत ७ बाद १९३ (अमित वर्मा खेळत आहे ७४, अरुण कार्तिक ५९; हार्दिक राठोड ३-३७, जयदेव उनाडकत ३-६०).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbais experience v madhya pradeshs steel
First published on: 14-02-2016 at 02:41 IST