चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बार्सिलोनासारख्या बलाढय़ संघाला धक्का देत बायर्न म्युनिक संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात म्युनिकने बार्सिलोनावर ३-० असा निर्विवादपणे विजय मिळवत अंतिम फेरीतील स्थान पक्केकेले. पहिल्या उपांत्य फेरीत ४-० असा विजय मिळवल्याने म्युनिकने एकंदरीत ७-० अशा मोठय़ा फरकासह अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत म्युनिकचा सामना बोरुसिया डॉर्टमंड संघाशी २५ मे रोजी वेम्बले येथे होणार आहे.
लिओनेल मेस्सीविना खेळणाऱ्या बार्सिलोनाने पहिल्या सत्रात चांगला खेळ केला. त्यांनी जोरदार आक्रमणे लगावली, पण गोल करण्यात ते अपयशी ठरले. त्याचबरोबर पहिल्या सत्रात अभेद्य बचाव करीत म्युनिकला एकही गोल करू दिला नाही. पहिल्या सत्रात दोन्ही संघ ०-० अशा बरोबरीत होते. दुसऱ्या सत्रात म्युनिकने सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण करायला सुरुवात केली आणि त्यामध्ये त्यांना यशही मिळाले. सामन्याच्या ४९व्या मिनिटाला अरजेन रोबेनने पहिला गोल करीत म्युनिकचे खाते उघडले. पहिला गोल झाल्यावर बार्सिलोनाचा संघ हताश वाटला. यामध्येच सामन्याच्या ७२व्या मिनिटाला गेरार्ड पिक्यूने स्वयं गोल करीत संघासाठी आव्हान अजूनच अवघड करून ठेवले.
स्वयंगोल झाल्यावर बार्सिलोनाचा संघ बिथरलेला वाटला आणि याचाच फायदा पुन्हा एकदा म्युनिकच्या संघाने घेतला. त्यानंतर फक्त चार मिनिटांनीच म्हणजे सामन्याच्या ७६व्या मिनिटाला थॉमस म्यूलरने गोल लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ३-० असा मोठा फरक झाल्यावर मेस्सी नसताना बार्सिलोनासाठी सामना जिंकणे अशक्यप्राय होते आणि तसेच झाले. ३-० अशी आघाडी घेतल्यावर म्युनिक संघाने बचाव अधिक भक्कम केला आणि बार्सिलोनाला गोल करण्यापासून परावृत्त करीत सामना सहजपणे खिशात टाकला.