अव्वल साखळीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात :- ‘क’ गटातून पाच विजयांसह अग्रस्थान मिळवून दिमाखात आगेकूच करणाऱ्या गतउपविजेत्या महाराष्ट्रासमोर गुरुवारी बलाढय़ दिल्लीच्या संघाचे आव्हान असणार आहे. सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळी सामन्यांना सुरत येथे सुरुवात होणार आहे.
राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या महाराष्ट्राने गटसाखळीत फक्त छत्तीसगड आणि चंदीगडविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. महाराष्ट्राची मदार प्रामुख्याने ऋतुराज गायकवाड आणि केदार जाधव या फलंदाजांवर असून नौशाद शेख आणि निखिल नाईक यांनीसुद्धा संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ऋतुराजने आतापर्यंत स्पर्धेत तीन अर्धशतके झळकावली आहेत. गोलंदाजीत समद फल्ला आणि सत्यजीत बच्छाव सातत्याने चमकदार खेळ करत आहेत.
दुसरीकडे ध्रुव शोरेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्लीने ‘इ’ गटात सातपैकी पाच लढती जिंकून अव्वल क्रमांक मिळवला होता. शिखर धवनसारखा प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय अनुभव असलेला खेळाडू दिल्लीच्या ताफ्यात असून नितीश राणा, सिमरनजीत सिंग आणि पवन नेगीसुद्धा त्यांच्याकडे आहेत.
अव्वल साखळीसाठी पात्र ठरलेल्या १० संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून ‘अ’ गटात महाराष्ट्र आणि दिल्लीव्यतिरिक्त राजस्थान, बडोदा आणि हरयाणा यांचा समावेश आहे. तर ‘ब’ गटात मुंबई, तमिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि झारखंड असे पाच बलाढय़ संघ आहेत.
मुंबईचा खडतर गटात समावेश
सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या अव्वल साखळीच्या सामन्यांना गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. या फेरीसाठी मुंबईचा खडतर गटात समावेश करण्यात आला आहे.
मुंबईचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला असून या गटात तमिळनाडू, कर्नाटक, पंजाब आणि झारखंड असे एकापेक्षा एक बलाढय़ संघ आहेत. नुकत्याच झालेल्या विजय हजारे स्पर्धेत कर्नाटक आणि तमिळनाडू यांनी अंतिम फेरी गाठली होती. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाचा आता खरा कस लागणार आहे. शुक्रवारी तमिळनाडूविरुद्धच्या सामन्याने मुंबई अव्वल साखळीच्या अभियानाला प्रारंभ करणार आहे.
आजचा सामना महाराष्ट्र वि. दिल्ली
वेळ : सकाळी ९.३० वा.