अव्वल साखळीतील अखेरच्या सामन्यात  पंजाबवर २२ धावांनी मात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नामांकित खेळाडूंचा भरणा असलेल्या मुंबईचे बुधवारी सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याचे स्वप्न उद्ध्वस्त झाले. कर्णधार सूर्यकुमार यादव (८० धावा), श्रेयस अय्यर (नाबाद ८०) आणि पृथ्वी शॉ (५७) या तिघांनी साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकांमुळे मुंबईने अव्वल साखळीच्या ‘ब’ गटातील अखेरच्या लढतीत पंजाबवर २२ धावांनी विजय मिळवला. परंतु निव्वळ धावगतीच्या शर्यतीत पिछाडीवर राहिल्यामुळे मुंबईचे आव्हान संपुष्टात आले.

या विजयामुळे मुंबईच्या खात्यात चार सामन्यांतून १२ गुण जमा झाले. कर्नाटकचेही तितक्याच सामन्यात १२ गुण आहेत. मात्र निव्वळ धावगती मुंबईपेक्षा सरस असल्यामुळे कर्नाटकने गटात दुसरा क्रमांक मिळवून अग्रस्थानावरील तमिळनाडूसह उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. मुंबईला पंजाबला १५० किंवा त्याहून कमी धावांत रोखणे अनिवार्य होते.

लालाभाई काँट्रॅक्टर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार आणि श्रेयस यांनी तिसऱ्या गडय़ासाठी ६६ चेंडूंत १४० धावांची भागीदारी रचल्यामुळे मुंबईने २० षटकांत तब्बल ३ बाद २४३ धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमारने ३५ चेंडूंतील या तुफानी खेळीत आठ चौकार आणि पाच षटकार लगावले, तर अय्यरने ४० चेंडूंत सात चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ८० धावांची खेळी साकारली. पृथ्वीने प्रत्येकी चार चौकार-षटकारांसह ५७ धावा केल्या.

प्रत्युत्तरात शुभमन गिल (७८) आणि अभिषेक शर्मा (४७) यांच्या झंझावाती फलंदाजीमुळे पंजाबने एक वेळ १४ षटकांतच १५४ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र हे दोघे पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर पंजाबची धावगती मंदावली आणि त्यांना ६ बाद २२१ धावांपर्यंतच मजल मारता आली.

 

गतउपविजेत्या महाराष्ट्राचेही आव्हान संपुष्टात

अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत अव्वल साखळीच्या ‘अ’ गटात हरयाणाला दोन धावांनी पराभूत केले. परंतु या विजयानंतरही गतउपविजेत्या महाराष्ट्राचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

या विजयामुळे महाराष्ट्राच्या खात्यात चार सामन्यांतून आठ गुण जमा झाले. राजस्थानचेही तितक्याच सामन्यात आठ गुण आहेत. मात्र निव्वळ धावगती महाराष्ट्रापेक्षा सरस असल्यामुळे राजस्थानने गटात दुसरे स्थान मिळवून उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. अग्रस्थानावरील हरयाणाने पहिले तीन सामने जिंकून या लढतीपूर्वीच उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला होता.

संक्षिप्त धावफलक

मुंबई : २० षटकांत ३ बाद २४३ (सूर्यकुमार यादव ८०, श्रेयस अय्यर नाबाद ८०; हरप्रीत ब्रार २/४४) विजयी वि. पंजाब : २० षटकांत ६ बाद २२१ (शुभमन गिल ७८, अभिषेक शर्मा ४७; तुषार देशपांडे २/३५)

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mushtaq ali cricket tournament akp 94
First published on: 28-11-2019 at 03:02 IST