हार्दिक पंड्याच्या गूढ दुखापतीतून धडा घेत राष्ट्रीय निवड समिती गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतून अष्टपैलू वेगवान गोलंदाजाचा शोध घेणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या  आगामी महालिलावामध्ये अष्टपैलू वेगवान गोलंदाज हीच बऱ्याच संघांची उणीव आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे आणि फलंदाजीचा सूर हरवल्यामुळे हार्दिक भारतीय संघाकडून ट्वेन्टी-२० विश्वचषकात झगडत असताना ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्सची दारेसुद्धा त्याच्यासाठी बंद होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी न करू शकलेल्या हार्दिकने न्यूझीलंडविरुद्ध दोन षटके गोलंदाजी करताना १७ धावा दिल्या. नुकत्याच झालेल्या ‘आयपीएल’मध्येही त्याने गोलंदाजी केली नव्हती. त्यामुळे विजय शंकर (तमिळनाडू), शिवम दुबे (मुंबई) आणि वेंकटेश अय्यर (मध्य प्रदेश) यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंकडे निवड समितीचे लक्ष असेल. सौराष्ट्रचा ३१ वर्षीय चिराग जैनसुद्धा उत्तम पर्याय आहे.

याशिवाय पृथ्वी शॉ (मुंबई), ऋतुराज गायकवाड (महाराष्ट्राचा कर्णधार) देवदत्त पडिक्कल, रविकुमार समर्थ (दोघेही कर्नाटक), शेल्डन जॅक्सन, एन. जगदीशन, सी. हरी निशांत (तमिळनाडू) हे फलंदाजसुद्धा भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी कामगिरी उंचावतील. मुंबईचे सामने गुवाहाटीला, महाराष्ट्राचे लखनऊला, तर विदर्भाचे विजयवाडा येथे होणार आहेत.

गटवारी
’ एलिट ‘अ’ : पंजाब, तमिळनाडू, ओदिशा, महाराष्ट्र, गोवा, पुडिचेरी
’ एलिट ‘ब’ : बंगाल, छत्तीसगड, कर्नाटक, मुंबई, बडोदा, सेनादल
’ एलिट ‘क’ : जम्मू-काश्मीर, झारखंड, हिमाचल, राजस्थान, हरयाणा, आंध्र प्रदेश
’ एलिट ‘ड’ : रेल्वे, आसाम, गुजरात, मध्य प्रदेश, केरळ, बिहार
’ एलिट ‘ई’ : उत्तर प्रदेश, हैदराबाद, उत्तराखंड, सौराष्ट्र, दिल्ली, चंडीगढ
’ प्लेट : त्रिपुरा, विदर्भ, नागालँड, मेघालय, मणिपूर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम