भारताला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील पहिले पदक मिळवून देण्याची किमया कुस्तीमध्ये महाराष्ट्राचे मल्ल खाशाबा जाधव यांनी केली. १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या या स्पर्धेत त्यांनी कांस्यपदक मिळवत देशाला स्वातंत्र्यानंतरचे पहिले ऑलिम्पिक वैयक्तिक पदक जिंकण्याचा पराक्रम केला. दुर्दैवाने त्यानंतर महाराष्ट्रातून त्या दर्जाचा पहिलवान तयार झालेला नाही आणि जर कोणी होत असेल तर गटबाजीच्या गलिच्छ राजकारणाद्वारे महाराष्ट्राला चारीमुंडय़ा चीत करण्याचाच सपाटा लावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रत्येक खेळाडू धडपड करीत असतो. महाराष्ट्राचे मल्लही त्याला अपवाद नाहीत. ऑलिम्पिक स्पर्धेची पूर्वतयारी मानल्या गेलेल्या आशियाई, राष्ट्रकुल व जागतिक स्पर्धामध्येही महाराष्ट्राच्या मल्लांनी पदकांची लयलूट केली आहे. मात्र प्रत्यक्ष ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मल्लांची निवड करताना किंवा पात्रता फेरीसाठी खेळाडूंची निवड करताना महाराष्ट्राच्या मल्लांना डावलले जाते. दुर्दैवाने महाराष्ट्राच्या कुस्तिगीरांना राष्ट्रीय स्तरावर कोणीही वाली नाही. जरी महाराष्ट्राचे संघटक राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असले तरी आपला एखादा खेळाडू भारतीय संघात बसवण्याची हिंमत किंवा धाडस ते दाखवत नाहीत. हे केवळ आता नव्हे तर गेली अनेक वर्षे सुरू आहे.

लॉस एंजेलिस येथे १९८४ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पध्रेसाठी नवी दिल्ली येथे भारतीय संघाची निवड चाचणी घेण्यात आली होती. त्या चाचणीत महाराष्ट्राच्या रामचंद्र सारंगने सर्व प्रतिस्पर्धी मल्लांना हरवले होते. त्यामुळे त्याची निवड होणे अपेक्षित होते. मात्र चाचणीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ जाहीर करण्यात आला. त्या वेळी सारंगने ज्या मल्लाला एकतर्फी चीतपट केले होते, त्याचीच वर्णी संघात लावण्यात आली होती. सारंग तंदुरुस्त नाही, असे कारण देत सारंगची बोळवण करण्यात आली होती. या चाचणीपूर्वी भारतीय संघातील संभाव्य खेळाडूंचे सराव शिबीर घेण्यात आले होते. त्या शिबिराला महाराष्ट्राचेच भालचंद्र भागवत हे प्रशिक्षक होते. प्रत्यक्ष ऑलिम्पिकला भारतीय संघाबरोबर एका पंजाबी संघटकाची नियुक्ती करण्यात आली. या सर्व निवड चाचणीचे प्रमुख म्हणून एका माजी ऑलिम्पिक हॉकीपटूकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. सारंग व भागवत या दोघांचाही एकाच वेळी पत्ता कट करण्यात आला.

अर्जुन पुरस्कारविजेते काका पवार यांनाही ऑलिम्पिक स्पर्धेपासून वंचित ठेवण्यात आले. काका यांच्याकडेही ऑलिम्पिक पदक मिळवण्याची क्षमता होती, मात्र सारंगप्रमाणेच त्यांचीही बोळवणच करण्यात आली. महाराष्ट्राच्या नरसिंग यादव या मल्लाने गतवर्षी जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. एवढेच नव्हे तर त्याने या पदकाद्वारे भारताला ऑलिम्पिक कोटाही मिळवून दिला आहे. त्याच्या दुर्दैवाने तो ज्या वजनी गटात म्हणजेच ७४ किलो गटात भाग घेतो, त्याच गटात ऑलिम्पिक रौप्य व कांस्यपदक विजेता सुशील कुमार हा भाग घेत असतो. साहजिकच नरसिंगने ऑलिम्पिक कोटा मिळवूनही सुशील कुमारचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. गेली दोन-तीन वर्षे दुखापतींनी ग्रासलेल्या सुशील कुमारने तंदुरुस्तीच्या कारणास्तव अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये भाग घेतलेला नाही. त्याच्या माघारीमुळेच नरसिंगला जागतिक स्पर्धेतील सहभागाची संधी मिळाली व त्याने या संधीचे सोने करीत कांस्यपदक जिंकले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या नरसिंगने कारकीर्दीत अनेक किताब मिळवले आहेत. महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा त्याने दोन वेळा जिंकली आहे. सुशील कुमारची तंदुरुस्तीबाबतची समस्या, त्याचे वाढते वय याचा विचार केल्यास नरसिंग हा तुलनेने जास्त तंदुरुस्त आहे व ऑलिम्पिक पदकाची त्याला जास्त संधी आहे. मात्र राष्ट्रीय स्तरावरील संघटनेत उत्तर भारतीय संघटकांचा मोठा दबावगट असल्यामुळे नरसिंगला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

राहुल आवारे या मल्लाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली आहे. देशात आयोजित केलेल्या पहिल्या प्रो कुस्ती लीगमध्येही त्याची निवड झाली होती. मात्र सध्या ऑलिम्पिक पात्रता फेरीत संधी देण्याबाबत त्याच्यावर अन्यायच होत आहे. असे किती तरी महाराष्ट्राचे मल्ल राष्ट्रीय स्तरावर असलेल्या गटबाजीच्या राजकारणाचे बळी ठरले आहेत. एरवी पंजाब, हरयाणा, दिल्ली येथील पहिलवान महाराष्ट्रात आयोजित केल्या जाणाऱ्या भरघोस पारितोषिकांच्या कुस्ती मैदानात भरघोस कमाई करण्यासाठी येतात. मात्र महाराष्ट्राचे मल्ल भारताच्या ऑलिम्पिक संघात आलेले उत्तर भारतीय संघटकांना आवडत नाही. वर्षांनुवर्षे राष्ट्रीय स्तरावर संघटक म्हणून काम करणाऱ्या महाराष्ट्रीय संघटकांना आपल्याच राज्यातील मल्लांवर होणारा अन्याय दिसत नाही, कारण त्यांच्या डोळ्यांवर सदोदित झापड लावलेली असतात. जोवर महाराष्ट्राचे संघटक राष्ट्रीय स्तरावर आपले वजन खर्च करणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्राचे मल्ल ऑलिम्पिकबाबत उपेक्षितच राहणार.

मिलिंद ढमढेरे

milind.dhamdhere@expressindia.com

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narsingh yadav maharashtra wrestling culture
First published on: 24-04-2016 at 03:27 IST