आपल्या प्रशिक्षकाच्या आकस्मिक निधनाच्या धक्क्याने विचलित न होता महाराष्ट्राच्या निखिल दुबे याने ७५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले आणि मुष्टियुद्धात(बॉक्सिंग) ऐतिहासिक कामगिरी केली. १९९४ नंतर प्रथमच महाराष्ट्राला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्धात सोनेरी यश मिळाले.
हेही वाचा : सर्वाधिक १४० पदकं पटकावत महाराष्ट्राच्या खेळाडूंची धडाकेबाज कामगिरी
महात्मा मंदिर सांस्कृतिक भवनात झालेल्या या स्पर्धेत निखिल याने अंतिम फेरीत मिझोरामचा खेळाडू मलसाव मितलूंगा याचा ५-० असा धुव्वा उडविला. निखिल हा मुंबई येथील ज्येष्ठ प्रशिक्षक धनंजय तिवारी यांचा शिष्य. निखिलने उपांत्य फेरीत प्रवेश केला हे कळल्यानंतर त्याच्या लढती पाहण्यासाठी तिवारी हे मुंबईहून अहमदाबादला येण्यासाठी मंगळवारी पहाटे दुचाकीवरून निघाले होते. मात्र वाटेतच त्यांचे अपघाती निधन झाले. हे वृत्त निखिल याला उपांत्य फेरी सुरू होण्यापूर्वी कळाले होते. मात्र त्याने आपले मन विचलित होऊ न देता उपांत्य आणि त्या पाठोपाठ अंतिम फेरीच्या लढतीत भाग घेतला. सुवर्णपदक जिंकूनच आपल्या गुरूंना श्रद्धांजली वाहण्याचे त्याचे ध्येय होते. त्या जिद्दीने तो दोन्ही लढती खेळला. निखिल याच्या वडिलांचे कोरोना महामारीच्या काळात निधन झाले होते. मुष्टियुद्धासाठी निखिल याला त्याच्या घरच्यांचे नेहमी सहकार्य मिळाले आहे.
सुवर्णपदक जिंकल्यानंतर निखील दुबेची प्रतिक्रिया –
अंतिम लढतीनंतर निखिल याने सांगितले, “हे सुवर्णपदक मी माझे गुरु धनंजय तिवारी तसेच माझ्या वडिलांना अर्पण करीत आहे. माझ्या आयुष्यात माझ्या कुटुंबाचाही महत्त्वाचा वाटा आहे. मी मुष्टियुध्दातच करिअर करीत असल्यामुळे आता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कौतुकास्पद यश मिळवून देण्याचे माझे ध्येय आहे. त्यादृष्टीनेच माझी पुढची वाटचाल असेल.”
‘मुष्टियुद्ध खेळाचा गौरव’ –
निखिल दुबेच्या सुवर्णपदकाचा बाबत गौरवोद्गार व्यक्त करीत महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक सतीशचंद्र भट, विजय गुजर, कृष्णा सोनी आणि व्यवस्थापक मदन वाणी यांनी सांगितले, निखिलच्या सुवर्णपदकांमुळे आमच्या खेळाचा गौरवच झाला आहे. त्याने दाखवलेली जिद्द आणि संयम खरोखरीच अतुलनीय आहे. त्याच्याकडून जागतिक स्तरावर अशीच कामगिरी होईल अशी आम्हाला खात्री आहे.
विजेतेपदामुळे सोनेरी सांगता – शिरगावकर
“निखिल याचे सुवर्णपदक सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. दुःखद प्रसंगातून जात असतानाही त्याने अतिशय धीराने आणि संयमाने उपांत्य व अंतिम फेरीची लढत खेळली. केवळ या लढती तो नुसता खेळला नव्हे तर त्याने दोन्ही लढती एकतर्फी जिंकून महाराष्ट्राची शान वाढवली. त्याच्या विजेतेपदामुळे आमच्या संघाची सोनेरी सांगता झाली आहे याहून मोठा आनंदाचा क्षण असू शकत नाही” अशा शब्दात महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी अभिनंदन केले.