तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजवर मात केली. विंडीजने विजयासाठी दिलेले ३१६ धावांचे आव्हान भारताने ४ गडी राखून पूर्ण केले. २०१९ या वर्षातील हा भारताचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना होता. भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली आणि वर्षाचा शेवट गोड केला.

निर्णायक एकदिवसीय सामन्यात नवदीप सैनी याला एकदिवसीय संघात स्थान मिळाले. त्याने या सामन्याच्या माध्यमातून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि दमदार गोलंदाजी केली. त्याने १० षटके फेकत ५८ धावा देऊन २ बळी टिपले. त्यातील रॉस्टन चेसचा बळी विशेष चर्चेचा ठरला. नवदीप सैनीने चेसला ‘सुपर-यॉर्कर’ टाकत त्रिफळाचीत केले. सुसाट येणारा चेंडू चेसला समजू शकला नाही. त्याने चेंडू बॅटने रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो त्रिफळाचीत झाला.

हा पहा व्हिडीओ –

भारताने जिंकला तिसरा एकदिवसीय सामना

प्रथम फलंदाजी करताना निकोलस पूरन आणि कर्णधार कायरन पोलार्ड यांच्या फटकेबाजीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ३१५ धावांपर्यंत मजल मारली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये टिच्चून मारा केला. शे होप, एविन लुईस, रॉस्टन चेस आणि हेटमायर यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. पण अखेरच्या षटकांमध्ये पूरन आणि पोलार्ड जोडीने फटकेबाजी करत संघाला ३०० पार पोहोचवले. पूरनने ८९ तर पोलार्डने नाबाद ७४ धावा केल्या. सैनीने २ तर जाडेजा, शार्दुल आणि शमीने १-१ बळी टिपला.
विंडीजने विजयासाठी दिलेल्या ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात आक्रमक झाली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतके झळकावली. राहुलने ७७ तर रोहितने ६३ धावा केल्या. त्यानंतर श्रेयस अय्यर, केदार जाध आणि ऋषभ पंत स्वस्तात माघारी परतले. पण विराटने एक बाजू लावून धरत रविंद्र जाडेजाच्या साथीने भारताचा डाव सावरला. विजयासाठी अवघ्या काही धावा हव्या असताना विराट त्रिफळाचीत झाला. ८५ धावांवर त्याला माघारी परतावे लागले. यानंतर रविंद्र जाडेजा आणि मुंबईकर शार्दुल ठाकूर या दोघांनी योग्य वेळी फटकेबाजी करत भारताला विजय मिळवून दिला.